देशाचे माजी पंतप्रधान : वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था / रोम
युरोपमधील महत्त्वाचा देश असलेल्या इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. बर्लुस्कोनी हे दीर्घकाळापासून आजारी होते आणि 10 जून रोजी त्यांना मिलान येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बर्लुस्कोनी हे ल्यूकेमियाने ग्रस्त होते. बर्लुस्कोनी हे इटलीतील सर्वात धनाढ्या राजकीय नेते होते आणि राजकारणात येण्यापूर्वी ते देशातील माध्यमसम्राट हेते. इटलीतील ‘प्लेबॉय’ नेते म्हणून त्यांना ओळखले जात होते.
बर्लुस्कोनी हे तीनवेळा इटलीचे पंतप्रधान झाले होते. 1994 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. फोर्जा इटालिया पक्षाचे नेते असलेले बर्लुस्कोनी लवकरच पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांच्या पक्षासोबत एक मोठी बैठक करणार होते. बर्लुस्कोनी हे सरकारमध्ये सक्रीय नसले तरीही त्यांना मोठे महत्त्व प्राप्त होते. बर्लुस्कोनी यांच्या निधनामुळे इटलीच्या राजकारणात अस्थिरता निर्माण होऊ शकते असे मानले जात आहे.
वादग्रस्त माध्यमसम्राट
इटलीचे वादग्रस्त माध्यम सम्राट बर्लुस्कोनी यांना 2008 आणि 2011 दरम्यान करभरणामध्ये फसवणूक केल्यामुळे शिक्षा झाली होती, तसेच 6 वर्षांसाठी निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात आली होती. 2022 मध्ये बर्लुस्कोनी यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात पुनरागमन केले होते. 2011 मध्ये त्यांच्यावर 33 महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप झाला होता. तर 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते.









