वृत्तसंस्था / शेनझेन (चीन)
विद्यमान विजेत्या इटली संघाने बिली जिन किंग टेनिस चषक पुन्हा स्वत:कडे राखला आहे. रविवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इटलीने अमेरिकेचा पराभव करत बिली जिन किंग चषकावर सलग दुसऱ्यांदा आपले नाव कोरले.
या अंतिम लढतीमध्ये इटलीच्या खेळाडूंनी पहिले दोन्ही एकेरी सामने जिंकून अमेरिकेवर आघाडी मिळविली होती. इटलीच्या आठव्या मानांकीत जस्मिन पावोलिनीने अमेरिकेच्या सातव्या मानांकीत जेसिका पेगुलाचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. तर दुसऱ्या एकेरीत सामन्यात इटलीच्या इलिसाबेटा कॉकिरेटोने अमेरिकेच्या इमा नेव्हारोचे आव्हान 6-4, 6-2 असे संपुष्टात आणले. इटलीने या अंतिम लढतीत पहिले दोन्ही एकेरी सामने जिंकून अमेरिकेवर 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्याने तिसरा दुहेरीचा सामना खेळविण्यात आला नाही. बिली जीन किंग चषक स्पर्धेला यापूर्वी फेडरेशन चषक स्पर्धा म्हणून ओळखले जात असे. दरम्यान या स्पर्धेत अमेरिकेचा संघ हा सर्वात यशस्वी संघ म्हणून गाजला गेला. त्यांनी 18 वेळा फेडरेशन चषक स्पर्धा जिंकली. पण 2017 नंतर अमेरिकेला या स्पर्धेत यश मिळू शकले नाही. इटलीचे या स्पर्धेतील हे सहावे विजेतेपद आहे. अमेरिकेने 2018 साली ही शेवटची स्पर्धा जिंकली होती.









