वृत्तसंस्था / मॅलेगा
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इटलीने अमेरिकेचा 2-1 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. 1976 नंतर प्रथमच इटलीचा संघ या स्पर्धेत जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. इटली आणि अमेरिका यांच्यातील या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात इटलीच्या सोनेगोने अमेरिकेच्या टायफोचा 6-3, 7-6 (7-5) असा पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जने इटलीच्या मुसेटीवर 7-6 (8-6), 6-3 असा विजय नोंदवून आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली होती. गुरुवारी झालेल्या दुहेरीच्या निर्णायक सामन्यात इटलीच्या सिमोन बोलेली आणि फॉगनिनी यांनी अमेरिकेच्या जॅक सॉक आणि टॉमी पॉल यांचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अमेरिकेचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत जर्मनी आणि कॅनडा यांच्यात होणाऱया सामन्यातील विजय संघाबरोबर इटलीचा उपांत्यफेरीचा सामना होईल. तर क्रोएशिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळविला जाईल. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ही स्पर्धा 28 वेळा जिंकली आहे. स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी होणार आहे









