वृत्तसंस्था/ मॅलेगा
रविवारी येथे झालेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील अंतिम लढतीत इटलीने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. डेव्हिस चषक स्पर्धेच्या इतिहासातील इटलीने 1976 नंतर म्हणजे तब्बल 47 वर्षांनंतर डेव्हिस चषकावर आपले नाव कोरले आहे.
या अंतिम लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात इटलीच्या मॅटो अमाल्दीने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्सी पॉपीरीनचा 7-5, 2-6, 6-4 असा पराभव केला. हा सामना शेवटपर्यंत अटीतटीचा झाला. दरम्यान या लढतीतील दुसऱ्या एकेरी सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरचा 6-3, 6-0 अशा सरळ सेटसमध्ये फडशा पाडला. या अंतिम फेरीपूर्वी झालेल्या उपांत्य लढतीत इटरीने बलाढ्या सर्बियाला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. इटलीच्या सिनेरने या लढतीत सर्बियाच्या टॉपसिडेड ज्योकोव्हिचला दुसऱ्यांदा पराभूत केले होते. इटलीने आतापर्यंत दोन वेळेला डेव्हिस चषक पटकाविला आहे. 2023 च्या टेनिस हंगामामध्ये इटलीच्या टेनिस क्षेत्रात टेनिसपटूंनी दर्जेदार कामगिरी केली आहे. या कालावधीत इटलीने डेव्हिस चषक, बिली जीन किंग चषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले आहे.









