जोडीदाराला बलात्कारसंबंधी टिप्पणी भोवली
वृत्तसंस्था/ रोम
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या स्वत:चा जोडीदार एंड्रिया गिआम्ब्रूनो यांच्याकडून विभक्त झाल्या आहेत. मेलोनी यांनी शुक्रवारी स्वत:च्या ब्रेकअपची घोषणा केली आहे. पत्रकार एंड्रियो गिआम्ब्रूनो यांनी अलिकडेच बलात्कारसंबंधी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता.
एंड्रिया गिआम्ब्रूनोसोबत माझे नाते सुमारे 10 वर्षांपर्यंत चालले. आता हे नाते संपुष्टात आले आहे. मागील काही काळापासून आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. आम्ही सोबत राहू शकत नाही हे स्वीकारण्याची वेळ आली असल्याचे मेलोनी यांनी फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
एंड्रिया गिआम्ब्रूनो आणि मेलोनी यांची पहिली भेट 2015 मध्ये एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्यानंतर दोघेही प्रेमात पडून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनाही जिनेवरा नावाची एक मुलगी असून तिचा जन्म 2016 मध्ये झाला होता.
जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. इटलीतील उजव्या विचारसरणीचा पक्ष ब्रदर्स ऑफ इटलीच्या त्या नेत्या आहेत. 2008 साली त्या वयाच्या 31 व्या वर्षी इटलीच्या सर्वात कमी वयाच्या मंत्री ठरल्या होत्या. स्वत:ची वक्तव्ये आणि उजव्या विचारसरणीकडे असलेल्या कलामुळे त्या चर्चेत असतात. स्वत:ला मुसोलिनीचा वारस ठरविणे आणि एलजीबीटी समुदायाला विरोध दर्शविण्यासाठी त्या ओळखल्या जातात. अलिकडेच पार पडलेल्या जी-20 परिषदेदरम्यान जॉर्जिया यांना भारतात मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
एंड्रिया यांनी ऑगस्ट महिन्यात स्वत:च्या शोमध्ये बलात्कारासंबंधी टिप्पणी केली होती. बलात्काराच्या एका प्रकरणी बोलताना त्यांनी पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. जेव्हा तुम्ही नृत्य करण्यासाठी जाता, तेव्हा तुम्हाला नशेत असण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर तुम्ही नशेत असण्यापासून आणि बेशुद्ध होण्यापासून वाचलात तर बहुधा तुम्ही आणखी काही गोष्टींपासूनही वाचाल असे त्यांनी म्हटले होते.









