एसजीपीडीए अध्यक्ष दाजी साळकर यांचे पाहणीवेळी आश्वासन : मडगाव, फातोर्डा आमदारांसह संबंधितांची बैठक घेणार
मडगाव : मडगावातील किरकोळ मासळी मार्केटमधील समस्या जाणून घेण्यासाठी दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे (एसजीपीडीए) अध्यक्ष आमदार दाजी साळकर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. येत्या आठवड्यात मडगाव आणि फातोर्डातील आमदारांसह संबंधितांची बैठक घेऊन आपण तोडगा काढणार असल्याचे साळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. किरकोळ मासळी मार्केटच्या सभोवतालील गटारे उपसली नसल्याने सांडपाणी योग्य प्रकारे वाहून जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच कामगार वापरून गटार साफसफाईचे काम हाती घेण्यात आल्याचे आमदार साळकर यांनी नजरेस आणून दिले. किरकोळ मासळी मार्केटच्या आंत तशी स्वच्छता आढळून येते. मात्र मासेविक्री करणारे विक्रेते खाली लोकांच्या ये-जा करण्याच्या जागेत बसून व्यवसाय करत असल्याने ग्राहकांना अडचणी होत असतात. त्यामुळे दिलेल्या प्लॅटफॉर्मवर बसून त्यांनी व्यवसाय करावा असे आपण स्पष्ट केल्याचे आमदार साळकर यांनी सांगितले. काही मासेविक्रेत्या महिलांनी बिले न फेडल्याने वीजबत्ती सकाळपासून नसल्याची कैफियत मांडली. पूर्वी आम्ही वीजबिलाचे पैसे देत होतो, पण या मार्केटचे पाच वर्षांपूर्वी सुशोभिकरण केल्यानंतर येथील मीटर काढण्यात आले, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात प्राधिकरणाचे अध्यक्ष साळकर यांना विचारले असता ते म्हणाले की, पावसाळ्यात वीजपुरवठा वरचेवर खंडित होत असतो. त्याचाच हा भाग असावा. जाणूनबुजून कोणी वीजपुरवठा बंद केलेला नाही, असे ते म्हणाले.
जास्त सोपो कर भरण्याचे आवाहन
साळकर यांनी किरकोळ मासळी मार्केटच्या देखभालीचा खर्च वाढत चालला असल्याने मासेविक्रेत्यांना जरा जास्त सोपो कर भरण्याचे आवाहन केले. या विक्रेत्यांची घाऊक मासळी बाजारातही किरकोळ मासेविक्री होत असून त्यावर कारवाई करावी अशी मागणी आहे. घाऊक मासळी मार्केटमध्ये कोलवा आणि बाणावली येथील काही मोजक्या पारंपरिक विक्रेत्यांना मासेविक्री करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी परवानगी दिली होती. मात्र आता रस्त्यांवर अतिक्रमण करून काही लमाणी व अन्य काही विक्रेते बेकायदा मासेविक्री करत आहेत. हा प्रकार मडगाव पालिकेच्या कार्यकक्षेत येत असून पालिकेकडून ही कारवाई अपेक्षित आहे, असे अध्यक्ष साळकर यांनी स्पष्ट केले.









