शहर म. ए. समितीचा निर्धार : शहापूर-वडगाव कार्यकर्त्यांची बैठक
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमावर्ती भागात सुवर्ण विधानसौध बांधून कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे याला उत्तर देण्यासाठी मराठी भाषिक दरवर्षी महामेळावा भरवून अधिवेशनाला आपला विरोध दर्शवित असतात. यावर्षीही सोमवार दि. 19 रोजी महामेळावा होणार असून, यामध्ये मराठी भाषिक आपली भाषिक अस्मिता दाखवून देतील, असा निर्धार शहर म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
शनिवारी शहर म. ए. समितीच्यावतीने शहापूर व वडगाव भागातील कार्यकर्त्यांसाठी जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक नेताजी जाधव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपिठावर शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, गोपाळराव बिर्जे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना किरण गावडे म्हणाले, कर्नाटक सरकारकडून या ना त्या कारणाने दडपशाहीचे धोरण अवलंबिले जात आहे. मराठी भाषिकांचा व्यवसाय, रोजगार, उद्योग बंद करण्याकडे सरकारचे लक्ष आहे. सरकारच्या या कुटनीतीला विरोध करण्यासाठी न्यायालयीन लढ्यासोबत रस्त्यावरची लढाई आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नेताजी जाधव यांनी सीमाप्रश्नाच्या इतिहासाची माहिती देत महामेळावा यशस्वी करणारच, असा निर्धार व्यक्त केला. रेणु किल्लेकर व सरिता पाटील यांनी महिलांना आवाहन केले. मनोहर हलगेकर यांनी सीमावासियांच्या समस्या मांडल्या. यावेळी रणजित हावळाण्णाचे, ज्ञानेश मण्णूरकर, अभिजित मण्णूरकर, शिवाजी हावळाण्णाचे, पी. जे. घाडी, वासू सामजी, सुधीर कालकुंद्रीकर यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









