मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार : मराठी अस्मिता दाखविण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी व बेळगाववर आपला हक्क दाखविण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने सुवर्ण विधानसौधची निर्मिती केली. दरवर्षी कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावमध्ये भरविले जाते. यावर्षीही अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार दि. 19 रोजी भव्य महामेळावा व्हॅक्सिन डेपो परिसरात होणार आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो परंतु महामेळावा यशस्वी करणारच, असा निर्धार मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
मध्यवर्ती म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीवेळी महामेळाव्याबाबत शहर, ग्रामीण व खानापूर तालुक्यातील सदस्यांशी चर्चा करण्यात आली. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले, कर्नाटक सरकारने दबाव टाकत समन्वय मंत्र्यांचा दौरा रद्द केला. या संदर्भात निवेदन देण्यासाठी म. ए. समितीचे कार्यकर्ते गेले असता जिल्हाधिकाऱ्यांनी भेटण्यास नकार दिला. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चार तास स्थानबद्ध करण्यात आले. या प्रकारामुळे घटनेची पायमल्ली झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
18 नोव्हेंबर रोजी महामेळाव्यासाठी पोलीस तसेच महानगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे. महामेळावा करा परंतु महाराष्ट्रातील नेत्यांना बोलवू नका, अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती. परंतु त्यापूर्वीच महाराष्ट्रातील पक्षप्रमुखांना पत्र पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावात जागृती करण्याचे आवाहन सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. खजिनदार प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, अॅड. एम. जी. पाटील, यशवंत बिर्जे, धनंजय पाटील, राजू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
खानापुरात गावोगावी होणार जागृती
खानापूर म. ए. समितीमध्ये एकीची प्रक्रिया सुरू असल्याने दोन्ही गटांच्या कार्यकारिणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 8 जणांची समिती नेमण्यात आली आहे. लवकरच नवीन कार्यकारणीची रचना केली जाणार आहे. त्यापूर्वी महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावात जागृती केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला रावजी पाटील, गोपाळ देसाई, किशोर हेब्बाळकर, हणमंत मेलगे यासह इतर उपस्थित होते.
शहर समितीची आज बैठक
बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बुधवार दि. 14 रोजी होणार आहे. सायंकाळी 5 वा. रंगुबाई भोसले पॅलेस येथे बैठक होणार आहे. यावेळी महामेळाव्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.