येत्या विधानसभेत पर्यटन कायदा संमत करणार
प्रतिनिधी/ पणजी
गोवा सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात पर्यटन कायदा आणून तो संमत करणार आहे आणि गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात आता नव्याने काही बदल करुन पर्यटकांसाठी गोवा अधिक आकर्षक बनविण्याचा प्रयत्न राहील. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी नवी दिल्लीहून परतल्यानंतर वरील माहिती दिली.
मंत्री रोहन खंवटे यांनी गेल्या दोन दिवसांत नवी दिल्लीमध्ये केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याबरोबर चर्चा केली व त्यांच्यासमवेतच केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी भेट घेतली. मंत्री रोहन खवटे यांनी आपल्याला पर्यटन क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत व जागतिक पातळीवर पर्यटन क्षेत्रात जशा सुविधा असतात तशा पद्धतीच्या सुविधा आपल्याला निर्माण करायच्या आहेत असे त्यांनी किशन रेड्डी यांना सांगताच अत्यंत प्रभावित झालेल्या रेड्डी यांनी आपले पूर्ण सहकार्य राहील. गोव्यासाठी आजवर पर्यटन मंत्रालयाने भरीव मदत दिलेली आहे. यानंतर देखील केवळ प्रस्ताव पाठवायचे. गोव्यासाठी विशेष मदतीचे आश्वासन त्यांनी रोहन खंवटे यांना दिले.
मंत्री रोहन खंवटे यांनी शनिवारी गोव्यात परतल्यानंतर ‘तरुण भारत’शी बोलताना आपण पर्यटन क्षेत्राचा विस्तार व विकास करणार आहोत. त्यासाठी पायाभूत सुविधा व नवे प्रकल्प उभारले जातील. या करिता अगोदर गोव्यात पर्यटन कायदा तयार केला जाईल. आगामी विधानसभा अधिवेशनात गोवा पर्यटन कायदा आणला जाईल, असे ते म्हणाले.
सर्व सुविधा केंद्र सरकार पुरविणार
रोहन खंवटे हे आयटी मंत्री देखील आहेत. त्यांनी नवी दिल्लीच्या दौऱयात केंद्रीय आयटीमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली व गोव्यात आयटी सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्रीय मदतीची मागणी केली. गोव्याने आयटी क्षेत्रात पाऊल टाकलेले आहे. परंतु आवश्यक त्या साधनसुविधा नसल्याने बरीच धांदल होते. गोव्यात आयटी क्षेत्रात ‘भुयारी फायबर केबल टाकणे’ शिवाय पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्याचा शाळकरी मुलांना देखील आधुनिक शिक्षणासाठी फार लाभ होईल. या शिवाय रोजगार निर्मितीकरिता आयटी उद्योग गोव्यात वाढणे आवश्यक आहे. उद्योग गोव्यात येणार तर त्याच्यासाठी आवश्यक साधनसुविधा उपलब्ध होण्याची गरज व्यक्त केली. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी आयटी क्षेत्राला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन रोहन खंवटे यांनी दिले.
खंवटे म्हणाले की, तुये आयटी औद्योगिक नगरी आणि पर्वरी येथे आयटी उद्योग यासाठी आपण सर्वात प्रथम प्राधान्य दिलेले आहे. दोन्ही उद्योग प्रकल्पातून सुमारे 12 हजार जणांना थेट रोजगार प्राप्त होईल. तुयेमधून 10 हजार तर पर्वरी येथून 1800 ते 2000 रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे व हे उद्दिष्ट पूर्ण करुच, असे ते म्हणाले.
430 जी 15
नवी दिल्ली ः केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांचे यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे.









