आमदार देविया राणे यांचे प्रतिपादन : ’काजू महोत्सव 2023’ची घोषणा 15 व 16 एप्रिल रोजी पणजीत आयोजन
पणजी : फ्रान्ससाठी जशी शाम्पेन तशीच ’गोव्यासाठी फेणी’ अशी ओळख जगभरात निर्माण झाली पाहिजे. खरे तर हे काम यापूर्वीच व्हायला हवे होते, परंतु ते झाले नाही. आता त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्यात यश मिळेल, असा विश्वास वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केला. पुढील महिन्यात दि. 15 आणि 16 रोजी पणजीत होणाऱ्या ’काजू महोत्सव 2023’ ची घोषणा करण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर त्यांच्यासोबत वनमंत्री विश्वजित राणे, प्रधान मुख्य वनपाल राजीव कुमार गुप्ता, वनमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार, सीआयआय गोवा च्या माजी अध्यक्ष स्वाती साळगावकर आदींची उपस्थिती होती. त्याशिवाय अन्य उपस्थितांमध्ये या महोत्सवात सहभागी होणाऱ्या जी-सुडा, आयसीएआर, गोवा जैवविविधता मंडळ, अबकारी खाते, आदींचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. राणे म्हणाल्या की, अन्य राज्यांच्या तुलनेत सध्या गोव्यात काजू उत्पादनात बरीच घट झाली आहे.राज्याचे काजू उत्पादन 40 हजार टनापर्यंत नेण्याचे ध्येय आहे. ब्राझीलसारख्या देशांना गोव्याचे काजू कौशल्य शिकण्याची इच्छा आहे. याकामी आवश्यक त्या प्रक्रिया आणि परवाने उपलब्ध करण्यासाठी अबकारी खात्याने मदत केली पाहिजे. वनमंत्री राणे यांनी यावेळी बोलताना सदर काजू महोत्सव सर्वांथाने यशस्वी करण्यासाठी आपल्या खात्याकडून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यायोगे महामंडळ फायद्यात आणण्याचे आमचे प्रयत्न असतील, असेही ते म्हणाले. यावेळी मंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर वनविकास महामंडळाच्या वेबसाईचेही प्रकाशन करण्यात आले. गोव्यातील काजू आणि फेणी उत्पादनांवर आधारित लघुपट दाखविण्यात आला. राजीव कुमार गुप्ता यांनीही विचार मांडले. सौरभ कुमार यांनी स्वागत केले. नंदकुमार परब यांनी आभार व्यक्त केले.









