शारीरिक शोषण करत असल्याची होती तक्रार
► भटिंडा / वृत्तसंस्था
पंजाबधमील भटिंडा येथील लष्करी छावणीत 12 एप्रिलला झालेला गोळीबार सैनिकानेच केला होता, असे स्पष्ट झाले आहे. या सैनिकाचे नाव मोहन देसाई असे असून त्याने आपल्या सहकारी सैनिकांवर गोळीबार केला होता. त्याला अटक करण्यात आली असून त्याने पोलिसांसमोर गुन्हा मान्य केल्याचे समजते. जे सैनिक आपले शारीरिक शोषण करीत होते, त्यांना आपण संपवले, असे त्याचे म्हणणे आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
या गोळीबारात चार सैनिक मृत्युमुखी पडले होते. प्रारंभी हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय होता. तथापि, तो तसा नसल्याचे आता उघड झाले आहे. भटिंडाचे एसएसपी गुलनीत सिंग यांनी या संबंधीची अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार आरोपीने एलएमजीं रायफलीची आठ काडतुसे, इन्सास रायफल आणि 20 काडतुसे असणाऱ्या एका मॅग्झिनची चोरी केली होती. ही चोरी त्याने त्याच स्थानकाच्या शस्त्रागारातून केली होती, असे स्पष्ट करण्यात आले.
रायफल सापडली
आरोपी सैनिकाने हत्या करण्यासाठी उपयोगात आणलेली रायफल जप्त करण्यात आली आहे. या रायफलीची तपासणी करण्यात येत आहे. त्याच्या मोबाईलचीही तपासणी केली जात आहे. त्याचे बाहेरच्या कोणाशी संबंध आहेत का, हे तपासले जात आहे. तसेच हा हल्ला त्याने एकट्यानेच केला की त्याचा कोणत्या टोळीशी संबंध आहे याचीही चौकशी केली जात आहे.
पहाटे साडेचार वाजता गोळीबार
मोहन देसाई याने हा गोळीबार स्थानकाच्या बराकीत पहाटे साडेचार वाजता केला. त्याने प्रथम अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हा गोळीबार एका पायजमा-कुडता परिधान केलेल्या अज्ञात व्यक्तींनी केल्याची बतावणी त्याने केली होती. हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले होते, असेही त्यांने सांगितले होते. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला असल्याची शंका बळावली होती. तथापि, आता सत्य समोर आले असून देसाई यानेच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे.
सीसीटीव्हीत कोणी दिसले नाही
स्थानकाबाहेर सीसीटीव्ही पॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, या पॅमेऱ्यांमध्ये बाहेऊन आलेली कोणतीही व्यक्ती दिसून आली नाही. त्यामुळे देसाई याच्यावरच संशयाची सुई रोखली गेली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर जंगलात पळून गेले अशी माहिती देसाई याने दिली होती. सेनेच्या अधिकाऱ्यांनी जंगलात शोधही घेतला होता. तथापि, कोणीही आढळून आले नाही. त्यामुळे देसाई याचीच चौकशी करण्यात आल्यानंतर त्याने गुन्हा मान्य केल्याचे स्पष्ट करण्यात आले.









