ऑनलाईन टीम / तरुण भारत :
तुम्ही शिवसेना सोडली, की आम्हीही काँग्रेस सोडू, असे शरद पवारांनी 2014 मध्ये भाजपला सांगितले होते. आमच्या आमदारांची संख्या कमी होती म्हणून आम्ही भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. त्यानंतर 2017 व 2019 मध्येही शरद पवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपशी चर्चा केली. शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर केले, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवारांच्या राजीनाम्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची 15 दिवस आधीपासून चर्चा होती. सुप्रिया सुळेंनी केंद्रात आणि अजित दादांनी महाराष्ट्रात पक्ष सांभाळावा, हे सगळं ठरलं होतं. पण तीन दिवसांनी त्यांनी अचानक माघार घेतली.
आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार पहिली सभा दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव या मतदारसंघात घेणार होते. मात्र, त्यांनी ती सभा रद्द करत माझ्या येवला मतदारसंघात सभा घेतली. बारामतीनंतर सर्वात जास्त विकास येवल्यात झाला. शरद पवारांनी मला येवल्यातून उमेदवारी दिली नव्हती. तर मी येवल्यातून उमेदवारी मागितली होती. शरद पवारांच्या घरातूनच बंड झाले आहे. ते का झाले? याचे आत्मपरिक्षण शरद पवार यांनी करावे. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे साथीदार का सोडून गेले, याचा विचार शरद पवारांनी करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.








