गोकाक तालुक्यात पतीने आवळला पत्नीचा गळा
प्रतिनिधी/ बेळगाव
पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, यासाठी सुवासिनी वटसावित्रीचे व्रत करतात. मात्र, वटसावित्रीच्या पूर्वसंध्येला पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना नांगनूर, ता. गोकाक येथे घडली आहे.
बसव्वा हणमंत हिडकल (वय 30) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पत्नीच्या खुनानंतर पती हणमंत सिद्धाप्पा हिडकल (वय 35) याने स्वत:हून पोलीस स्थानकात हजर होऊन खुनाची कबुली दिली आहे. मुडलगी पोलिसांनी हणमंतला ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बसव्वा मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवत होती. हणमंत बेरोजगार होता. शुक्रवार दि. 2 जून रोजी रात्री बसव्वाने आपल्या पतीला ‘घरी रिकामे बसून काय करता, काही तरी कामधंदा करा’ असा सल्ला दिल्याने या दाम्पत्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर हणमंतने गळा आवळून पत्नीचा खून केला आहे.
घटनेची माहिती समजताच मुडलगीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल ब्याकुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पत्नीच्या खुनानंतर संशयित आरोपी पती स्वत:हून पोलीस स्थानकात हजर झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या दाम्पत्याला दहा वर्षांचा एक मुलगा आहे. मुडलगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.