सेन्सेक्स 314 अंकांनी तेजीत : इन्फोसिस समभाग चमकला
मुंबई :
आयटी समभागांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअरबाजार तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला. ऑटो, आयटी निर्देशांकांनी मजबूत कामगिरी केल्याने दोन्ही बाजारात चैतन्य पाहायला मिळाले. मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 314 अंकांनी वाढत 81101 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा समावेश असलेला निफ्टी निर्देशांक 95 अंकांनी वाढीसोबत 24868 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 29 अंकांनी वाढत 54216 अंकांवर सपाट स्तरावर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभाग हे तेजीसह बंद झाले होते तर उर्वरीत 9 समभाग घसरत बंद झाले. निफ्टी निर्देशांकातील 50 समभागांपैकी 33 समभाग तेजीवर स्वार होते. बँक निफ्टी निर्देशांकातील 12 पैकी 6 बँकांचे समभाग मजबूत होत बंद झाले. विविध निर्देशांकाची कामगिरी पाहिल्यास आयटी, एफएमसीजी व फार्मा क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी पाहायला मिळाली, परिणाम हे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. दुसरीकडे रियल्टी, तेल व गॅस निर्देशांक मात्र घसरणीत होते.
आयटी निर्देशांक तेजीत
आयटी निर्देशांक जवळपास 3 टक्के इतका मजबूत होत बंद झाला. यात बायबॅक योजनेमुळे इन्फोसिसचा समभाग सर्वाधिक 5 टक्के इतका तेजीत राहिला होता. या निर्देशांकाला अधिक बळकट करण्यात विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक व टीसीएस यांची तेजीची कामगिरी कामी आली.
ऑटो निर्देशांकाची चमक मंगळवारीही कायम राहिली होती. यामध्ये मारुती सुझुकी व आयशर मोटर्स यांचे समभाग अधिक वधारलेले होते. रेल्वेशी संबंधीत समभाग रेलटेल मंगळवारी 6 टक्के इतका वाढला होता. कंपनीला बिहारमध्ये 660 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त झाले आहे. याचा परिणाम म्हणून समभाग तेजीत होता. मिडकॅप-100 103 अंकांनी वाढत 57464 वर तर स्मॉलकॅप-100 59 अंकांनी वाढत 17744 अंकांवर बंद झाला होता. रुपया 14 पैसे मजबूत होत 88.10 वर बंद झाला.









