त्या दिवशी शैलाताई अगदी गयावया करतच आल्या. मॅडम, मॅडम चुक झाली माझी. ऐकले नाही मी..आता काय करावे सुचत नाही. ते, ते इथे आले तर? त्यांनी तक्रार केली आणि मला पोलिसांनी पकडलं तर?
शैलाताई..शांत व्हा. इथे कुणीही येणार नाही. तुम्ही इथे बसा पाहु आधी. शैलाताईंना खुर्चीत बसवलं आणि पाण्याचा ग्लास हातात दिला. त्यांनी घटाघट पाणी संपवले आणि दणकन् ग्लास टेबलावर ठेवला..तसा आपटलाच म्हणा..शैलाताईंची अस्वस्थता, चीडचीड, त्रागा सगळं समोर स्पष्ट दिसत होतं. तसा त्यांचा-माझा तसा जुनाच परिचय. परंतु अलीकडे भेट झाली नव्हती. त्यादिवशी समोर आल्या तर वेगळ्या मनस्थितीत.
शैलाताई, बरं वाटतंय ना? अं..हो.. हो.
बरं..आता मला सांगा काय झालं आहे? कोण पकडून नेतील?
मॅडम, मागे पहा मी रितेश विषयी तुम्हाला सांगितले होते.
हो तुमचा भाचा ना? हो. हो,
त्याचं काय झालं? बरा आहे का तो आता?
कसलं काय ..आता त्याला जास्तच भास व्हायला लागलेत. कुणीतरी दिसतं, त्याच्याशी बोलतं म्हणतो..मधेच अगदी शांत असतो. मधेच असं काही झालं की येरझारा घालतो, विचित्र हातवारेही करतो. चेहराच बदलतो त्याचा. काही समजत नाही.
काय नाही केलं त्याच्या आईने..सगळं करुन झालं..
शैलाताई, बाकी सगळं राहु दे. तुम्ही त्याला मनोविकारतज्ञांकडे घेऊन गेला होतात का?
अं…ते.. ते
काय विचारते आहे मी?
नाही..बाकीचे उपचार केले तिने..बाकीचे म्हणजे?
आम्हाला वाटलं तो कुठेतरी सापडला आहे. बाहेरची बाधा आहे. अहो, काय हे? त्याच्या आईला, तुम्हाला काय सांगितलं होतं मी? नंबर ही दिला होता ना डॉक्टरांचा. अजून उपचारांना सुरवातही झाली नाही?
नाही…ते बाहेरचं पाहिलं जरा.
तसं चुकलंच हो आमचं..मॅडम आणि एक वेगळा प्रॉब्लेम झालाय. माझ्या बहिणीला वाटलं लग्न केल्यावर सुधारेल तो..म्हणून लग्नासाठी खटपट सुरु होती. तो ठीक असताना मुलगी पाहिली. दोघांची पसंतीही झाली. नंतर ज्यावेळी पुन्हा एकदा सगळे बैठकीसाठी भेटलो तेव्हा याने अचानक परत तसंच केलं. लग्न मोडलं..मुलीकडचे लोक चिडलेच आमच्यावर. तुम्ही रागावू नका, पण..पण..मीच पुढाकार घेतला होता त्यात…
आता मात्र थोड्या वेगळ्या शब्दात समज देणं गरजेचं होतं. थोडी कानउघडणी केल्यावर, पुन्हा शैलाताई गयावया करु लागल्या. चुकलं हो, चुकलंच आमचं ..तुम्ही सांगूनही असं वागलो आम्ही. माफ करा.
हे पहा प्रश्न मी सांगितले की अजून कुणी हा नाही. यामध्ये त्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचही आयुष्य पणाला लावत आहात तुम्ही. लक्षात येतंय का तुमच्या? अं..हो हो..त्याला उपचारांची गरज आहे. आधी नीट बरा तर होऊ दे तो.
त्याच्या आईला फोन करा. मला बोलायचे आहे. शैलाताईंनी फोन लावल्यावर मीनामावशींना थोड्या कडक शब्दातच समज दिली आणि रितेशला त्वरीत मनोविकारतज्ञांकडे नेण्यासंदर्भात सांगितले. दोन दिवसांनी मीनाताईंनी फोन करुन उपचारांना सुरुवात झाल्याचे सांगितले. रितेश सारखीच अनेक उदाहरणे पहायला मिळतात.
नेहाची केसही अशीच काहीशी..नेहाला खूप उदास वाटायचे, तिचे कशातही लक्ष लागत नव्हते. मध्येच ती रडू लागायची. कधी अगदी शांत असायची तर कधी अस्वस्थ. अलीकडे तिची भूकही मंदावली होती. तिला कशातच रस वाटेनासा झाला. काही दिवसांसाठी बदल म्हणून नेहाच्या सासरच्या मंडळींनी तिला माहेरी पाठवले.
तिच्या माहेरच्या मंडळींना आणि सासरीही असे वाटत होते की ‘एक मुल’ झाले की हे सारे सुरळीत होईल. परंतु नेहामध्ये काहीतरी वेगळा बदल झालाय हे तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आले आणि तिने नेहाच्या वडिलांना मला भेटायला सांगितले. नेहा थोडी ठिक असताना तिचे वडील तिला घेऊन आले होते. तिच्या सोबत संवाद साधल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. तिला समुपदेशनासोबतच औषधांचीही गरज होती. तिच्या पतीलाही बोलावुन या विषयी सविस्तर बोलणे झाले. समजाऊन सांगितल्यानंतर नेहाला मनोविकारतज्ञांकडे घेऊन जायला ते तयार झाले. योग्य औषधोपचार, समुपदेशन याची सांगड घालत नेहा त्यातून बाहेर पडली.
या क्षेत्रात काम करत असताना अशा अनेक केसेस समोर येतच असतात. काही वेळा लग्न झालं की सुधारेल किंवा एक मुल होऊ द्या मग पहा कसं सगळं सुरळीत होतं ते! अशा पद्धतीच्या समजुती अनेकदा पहायला मिळतात. लग्न झाल्यावर किंवा मुलं झाले की अशा पद्धतीची समस्या सुटेल असं कुटुंबियांना वाटत असतं. परंतु लग्न हा मानसिक आजारावरचा उपचार नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. अशा मानसिक स्थितीमध्ये लग्न, नातीगोती हे सारं निभावणं त्याला किंवा तिला जमेल का? याचा विचार कुटुंबियांनी करायला हवा. अन्यथा अशा निर्णयातून समस्या सुटण्याऐवजी वेगळ्या समस्या, प्रश्न निर्माण होतात आणि समस्येचा गुंता अधिक वाढत जातो.
मुळातंच शरीरासारखं मनही आजारी पडतं हे आजही अनेकांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आले तरी काहीवेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. लग्न झाल्यावर सुधारेल असं वाटुन लग्न उरकुन टाकलं जातं. तर काही वेळा आजाराविषयीची, सुरु असलेल्या औषधाविषयी पूर्वकल्पना न देता लग्न केलं जातं, समोरच्या व्यक्तीला हे काहीच माहीत नसल्याने सुरु असलेले उपचार थांबतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अचानक औषधे थांबवली की काही दिवसांनी पुन्हा त्रास सुरु होऊ शकतो. याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या लोकांसमोर अचानक काही गोष्टी येतात आणि मग कशी फसवणूक झाली याचे वाद निर्माण होतात. संसार तर मोडतोच परंतु ज्या व्यक्तीला असा त्रास होत होता तिची परवड होते. तिला अजून वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
अर्थात ज्यांना काही मानसिक विकारांचा सामना करावा लागला आहे त्यांनी लग्न करायचेच नाही असा त्याचा अर्थ नाही. आधुनिक उपचारपद्धती, औषधे, समुपदेशन यांचा योग्यवेळी आधार घेतला तर अनेक केसेसमध्ये चांगली सुधारणा होते. सुधारणा झाल्यानंतर विवाह करत असताना ज्यांच्यासोबत नाते जुळणार आहे त्या कुटुंबाला सुरु असलेल्या औषधउपचारांची नीट कल्पना देऊन परस्परसंमतीने लग्न झाले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. काही औषधे काही काळ सुरु ठेवायची असतील तर त्यात खंड पडत नाही. परस्पर सामंजस्याने, जीवनाची वाटचाल अधिक उत्तम होण्यास मदत होते. मनोविकार हे औषधे, समुपदेश या साऱ्याने आटोक्यात येऊ शकतात परंतु त्यासाठी मन ही आजारी पडते याचा स्विकार आणि तज्ञांचे मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे आहे. रोगाचे वेळेवर निदान आणि उपचार या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मनाच्या बाबतीत अधिक सजग होत त्या दृष्टीने वाटचाल झाली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील हे मात्र निश्चितच!
अॅड. सुमेधा संजीव देसाई








