दुर्गामाता दौडमुळे भगवे ध्वज, सजीव देखाव्यांनी चैतन्यमय वातावरण
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये श्री दुर्गामाता दौडनिमित्त गुरुवारी गावोगावी भगवे ध्वज, भगव्या पताका, सजीव देखावे आदी साकारण्यात आले होते. तर महिला, पुरुष, तरुण, तरुणी व बालचमुनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता. त्यामुळे गावोगावी शिवसृष्टी अवतरल्याचा भास होत होता. सांबरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून श्री दुर्गामाता दौडीला प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन, भगवा ध्वज पूजन व शस्त्रांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रेरणामंत्राने दौडीला प्रारंभ झाला. गावातील प्रमुख मार्गावरून दौड निघाली. मारुती गल्लीमध्ये मोरया ग्रुपच्या वतीने रामायण काळातील रामसेतूचा देखावा सादर करण्यात आला होता. याचबरोबर स्वराज्य सेना युवक मंडळासह इतर अनेक मंडळांच्या वतीने अनेक ठिकाणी सजीव देखावे सादर करण्यात आले होते.
गल्लोगल्ली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. तर दौडीचे पुष्पवृष्टी करून व आरती ओवाळुन स्वागत करण्यात येत होते. शेवटी परत दौड छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आल्यानंतर ध्येयमंत्राने दौडीची सांगता झाली. तत्पूर्वी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बाळेकुंद्री खुर्द येथे मेन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दौडीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून दौड निघाली. गल्लोगल्ली महिलांनी सजीव देखावे सादर केले होते. तर भगवे ध्वज, भगव्या पताका यामुळे अवघे गाव भगवेमय झाले होते. शेवटी दौड दुर्गादेवी कॉलनी येथे आल्यानंतर ध्येयमंत्राने दौडीची सांगता करण्यात आली. यावेळी सर्वांना अल्पोपाहार वाटण्यात आला. त्याचबरोबर बसवन कुडची, बसरीकट्टी ,निलजी, मुतगे, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, कणबर्गी, कलखांब, मुचंडी, चंदगड, अष्टे, खणगाव आदी गावांमध्येही दौडची उत्साहात सांगता करण्यात आली.









