अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीजपुरवठा ठप्प पणजी, म्हापशात आठ इंच पाऊस : आज- उद्या मुसळधार पावसाचा इशारा
पणजी : राजधानी पणजीसह संपूर्ण गोव्याला मंगळवारी रात्री उशिरा पावसाने झोडपून काढले. यंदाच्या वर्षातील सर्वाधिक 8 इंच पावसाची नोंद पणजीत झाली. त्याचबरोबर संपूर्ण गोव्यात सरासरी 6 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे यंदाच्या पावसात असलेली तूट आता 50 टक्क्यांवर आली असून राज्यातील धरणांची अवस्था सुधारली आहे. त्याचबरोबर नद्या भरून वाहू लागल्या आहेत. गोव्याला आवश्यक असलेल्या मुसळधार पावसाची गरज मंगळवारी पूर्ण झाली. दि. 30 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, रात्रभर गोव्यात सर्वत्र पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले. झाडे उन्मळून पडली. अनेक भागात वीज पुरवठा ठप्प झाला. सोमवारी पावसाने उसंत घेतली होती. मंगळवारी किंचित पाऊस पडला. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरले असतानाच मंगळवारी रात्री 9 वा. च्या दरम्यान मुसळधार पावसाने राजधानीसह संपूर्ण गोव्याला झोडपून काढले. यंदाच्या मौसमातील विक्रम पावसाने केला आणि सरासरी 6 इंच एवढी विक्रमी नोंद एकाचदिवशी झाली. राजधानी पणजी शहराला पावसाने रात्री उशिरा झोडपून काढल्याने पणजी शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. 18 जून रस्त्यावर तीन फूट पेक्षाही जास्त पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांचे अक्षरश: हाल झाले. पर्यटकही अडकले. अनेक दुचाकींमध्ये व हॉटेलमध्ये पाणी घुसले. अग्निशामक दलाच्या जवानांची मंगळवारी रात्री त्रेधा उडाली. राजधानी पणजीत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पणजीत जागोजागी पाणी साचले. रस्त्यांवर ख•s पडल्याने पणजीकरांची धांदल झाली. मंगळवारी संपूर्ण गोव्यात रात्रभर पाऊस कोसळल्याने शेतीकामांना बुधवारी मोठ्या उत्साहात पुन्हा सुरूवात झाली. जमिनीतील पाण्याचा स्तर पुन्हा वाढला व अनेक गावांमध्ये पुन्हा जमिनीतून वाहणारे झरे कार्यान्वित झाले.
पणजी, म्हापशात विक्रमी पाऊस
पणजी व म्हापसा येथे प्रत्येकी 8 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. यंदाच्या मौसमातील हा सर्वाधिक पाऊस गणला गेला आहे. आज व उद्या राज्यात मुसळधार पाऊस पडेल. 1 जुलैपासून मात्र पावसाचा जोर थोडा कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गोव्यात आजही पावसाबरोबर जोरदार वादळी वारे वाहणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
अंजुणे धरणात दीड मीटरने स्तर वाढला
अंजुणे धरणक्षेत्रात सर्वात कमी म्हणजे केवळ दीड इंच एवढीच पावसाची नोंद झाली. बुधवारी दिवसभरात ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पाऊस पडून गेला, परंतु केवळ 6 मि. मी. एवढा पाऊस पडला. सायंकाळी उशिरा पावसाची रिपरिप पुन्हा सुरु झाली. अंजुणे धरणात बुधवारी सायंकाळी 5 वा. पर्यंत दीड मीटरने पाण्याची पातळी वाढली. धरणात पाणी जमण्यास आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. अद्याप डोंगरावरून येणारे झऱ्यांचे पाणी वा छोटे छोटे धबधबे कार्यान्वित झालेले नाहीत. डोंगराळ भागात अद्याप मुसळधार पाऊस पडत नाही. आणखी 4 दिवसानंतर डोंगरदऱ्यातून पाण्याचे झरे सुरू होतील व अंजुणे धरणात पाण्याची पातळी वाढत जाईल, असे अभियंत्यांचे म्हणणे आहे.









