तिळामळ गणेशेत्सवाच्या देणगी कूपन विक्रीस प्रारंभ
वार्ताहर /केपे
एखाद्या धार्मिक स्थळावरून अन्य धर्मावर बोलणे हे चुकीचे आहे. त्यातून तणाव निर्माण होत असतो. म्हणून मुद्दामहून असे बोलणे टाळले पाहिजे, असे उद्गार समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी तिळामळ, केपे येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कूपन विक्रीच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना काढले. होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, डॉमनिक फर्नांडिस, केपेच्या नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, शेल्डेच्या सरपंच कविता गावस देसाई, उपसरपंच प्रमोद गावस देसाई, मंडळ अध्यक्ष नीलेश गावस देसाई व इतर हजर होते. एखादे वेळी जाहीर सभेतून राजकारणी काही बोलले, तरी ते कोणी मनाला लावून घेत नाही. मात्र एखाद्या धार्मिक स्थळावरून जो प्रचार-अपप्रचार होतो तो बंद होणे गरजेचे आहे. गोव्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती लोकांनी आपुलकीचे नाते जपून ठेवले आहे. ते नाते तसेच गोमंतकीयत्वही राखून ठेवले पाहिजे, असे फळदेसाई पुढे म्हणाले. मंडळाचे कौतुक करताना अशा व्यासपीठावरून सर्व संबंध आणखी दृढ होत असतात, असे फळदेसाई म्हणाले. या दिवसांत जे काही चालले आहे तसे होता कामा नये. लोकांची दिशाभूल करणे, एकतेमध्ये फूट पाडणे योग्य नव्हे. हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व धर्मांच्या लोकांना घेऊन पुढे जात आहे. अशा कार्यास सर्वांनी हातभार लावावा, असे मंत्री काब्राल यांनी सांगितले. तिळामळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चांगले काम करत असून त्यांनी आपले कार्य असेच चालू ठेवावे, असे आवाहन कवळेकर यांनी केले.









