उच्च न्यायालयाने दिली विदेशात जाण्याची अनुमती
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळ उच्च न्यायालयाने एका सत्र न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरविला आहे. सत्र न्यायालयाने अमली पदार्थांप्रकरणी आरोपी असलेल्या एका इसमाला विदेशात जाण्याची अनुमती देण्यास नकार दिला होता. सत्र न्यायालयाने विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यासारख्या हाय प्रोफाइल फरार लोकांचे उदाहरण देत आरोपीला विदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी चुकीची तुलना केली आहे. विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यासारख्या व्यक्तींची उदाहरण देणे चुकीचे होते असे न्यायाधीश व्ही.जी. अरुण यांनी म्हटले आहे.
सूर्यानारायणन हा अमली पदार्थांशी संबंधित कायद्याच्या अंतर्गत आरोपी आहे. त्याच्या विरोधात त्रिशूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला प्रलंबित आहे. त्याला 6 मार्च 2019 रोजी त्रिशूर जिल्हा न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. यानंतर त्याने विदेशात काम करण्यासाठी जाण्याची अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. फरार विजय मल्ल्या आणि नीरव मोदीचे उदाहरण देत सत्र न्यायालयाने विदेशात जाण्यासाठीची अनुमती देता येणार नसल्याचे म्हटले होते.
आरोपी विदेशात फरार झाल्यास त्याला परत आणणे अवघड ठरेल. आम्ही विजय मल्ल्या आणि नीरव मोदीलाही परत आणू शकत नाही, त्यांनी हजारो कोटींची आर्थिक फसवणूक केली आणि आता विदेशात स्वत:च्या जीवनाचा आनंद घेत आहेत. आरोपी परत आला नाही तर त्याला कोण आणणार अशी टिप्पणी सत्र न्यायाधीशाने याचिका फेटाळत केली होती.
सत्र न्यायालयात 4 हजाराहून अधिक खटले प्रलंबित असून यातील 1 हजाराहून अधिक खटले 5 वर्षांपेक्षा जुने असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. जर दोन वर्षापर्यंत आरोपीचा खटला निकाला काढला जाऊ शकत नल्यास त्याला विदेशात काम करण्याची संधी न देणे चुकीचे ठरेल. आरोपीला विदेशात जाण्याची अनुमती सशर्त देण्यात यावी असा आदेश उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला दिला आहे.









