देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांचा दावा : सरकारी अहवाल हाती आल्यानंतर कृती ठरवणार
डिचोली : शिरगाव डिचोली येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या सत्यशोधन समितीकडून देवस्थान समितीला दोषी धरणे चुकीचे असून देवस्थान समितीने पोलिस व प्रशासनाला सर्व ते सहकार्य करीत जत्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व मदत केलेली आहे, असे श्री लईराई देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर यांनी काल बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
सत्यशोधन समितीतर्फे करण्यात आलेली चौकशी व सरकार दरबारी सादर करण्यात आलेला अहवाल हा केवळ आमच्या कानी पडलेला आहे. अद्याप त्या अहवालाची प्रत आमच्याकडे आलेली नाही. सदर अहवाल आमच्या हातात आल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल. त्यानंतर काय कृती करावी हे देवस्थान समितीचे पदाधिकारी व सर्व देवस्थानचे महाजन एकत्र येऊन ठरविणार आहेत. तथापि या प्रकरणात देवस्थान समितीचा कोणताही हात नसून देवस्थान समितीला दोषी धरणे चुकीचे आहे, असे देवस्थानचे म्हणणे आहे.
शिरगावच्या जत्रोत्सवात देवस्थान समितीने आपल्या परीने प्रशासनाला तसेच प्रशासनातील सर्व यंत्रणांना सर्व ते सहकार्य केलेले आहे, असे गावकर म्हणाले. यापूर्वी देवस्थानचे अध्यक्ष दिनानाथ गावकर यांनी व इतर महाजनांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेस देवस्थान समिती कोणत्याही पद्धतीने जबाबदार नसून प्रशासनातून झालेली दिरंगाई व ढिलाई यावरून प्रशासनावर बोट ठेवले होते. तसेच समितीचा या घटनेत कोणताही दोष नसून समिती पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले होते.









