मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर : मातृभाषेतून शिक्षण हा पंतप्रधान मोदींचा दंडक
प्रतिनिधी / कोल्हापूर
देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळाले पाहिजे, असा दंडक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्यानुसार मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या सीमाभागातील बांधवांना मराठी भाषेत सरकारी कागदपत्रे उपलब्ध करून देणे हे कर्नाटक सरकारचे कर्तव्य असून त्यांनी सीमावासियांना मराठी भाषेत कागदपत्रे द्यावीत, असे आवाहन मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
जुनोनी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे वारीमध्ये भरधाव कार घुसून घडलेल्या दुर्घटनेत कोल्हापूरमधील सात वारकऱयांचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले. मृत वारकऱयांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री केसरकर गुरुवारी कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही राज्यातील राज्यपालांची बैठक होत आहे, यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
केसरकर म्हणाले, सीमाभागातील प्रश्नांवर दोन्ही राज्यातील राज्यपालांची बैठक होत असेल तर स्वागतच आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईमध्ये मराठी संमेलन आयोजित करत आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संमेलनाच्या तारखा निश्चित करतील. या संमेलनाला जगभरातील मराठी भाषिक उपस्थित राहतील. त्याचबरोबर बेळगावमधील मराठी भाषिकही संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या माध्यमातून सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय देण्याचा प्रयत्न असणार आहे. कर्नाटकमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसेल तर मराठी भाषा मंत्री म्हणून कर्नाटकच्या राज्यपालांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.
केसरकर पुढे म्हणाले, दिल्लीसारख्या केंद्रशासित प्रदेशामध्ये पंजाबी भाषेचा वापर होतो. मग कर्नाटकच्या काही भागामध्ये मराठी भाषेचा वापर होण्यात कमीपणा वाटण्याचे काही कारण नाही. लोकांना जे पाहिजे ते सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे. मातृभाषेत शिक्षण मिळालेच पाहिजे, असा दंडक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. मग ज्यांनी मातृभाषेत शिक्षण घेतले आहे, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये सरकारी कागदपत्रे उपलब्ध करून देणे हे कर्नाटक सरकारचे कर्तव्य आहे. यासंदर्भात सीमाभागातील मराठी बांधवांना न्याय मिळवून देणे हे मराठी भाषा मंत्री म्हणून आपले कर्तव्य आहे. यामध्ये कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिले.









