अध्याय पहिला
अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे कौरव अभिमानाच्या मस्तीने बहकून जरी लढण्याकरता आले असले तरी पण आम्ही आपले हित कशात आहे ते पाहिले पाहिजे. कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कुळाचाच नाश होतो. असे असताना आम्ही ह्या महापातकाचा त्याग करायला हवा. प्रतिकार न करता मी जर नि:शस्त्र होऊन बसून राहिलो आणि मला कौरवांनी रणात ठार मारले तरी माझे कल्याण होईल. ह्याप्रमाणे दु:खात चूर झालेला अर्जुन हातातील धनुष्य बाण टाकून रथात बसून राहिला ह्या अर्थाचा असे रणात बोलूनि शोकावेगात अर्जुन । धनुष्य-बाण टाकूनि रथी बैसूनि राहिला ।।47।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार संजयला रथाचा त्याग केलेला अर्जुन निस्तेज, मोहाने ग्रासलेला आणि दु:खाने पिडीत दिसला. त्याने धनुष्यबाण टाकून दिलेले होते. त्याच्या डोळ्यांतून अनिवार पाणी येत होते. कौरवांनी पांडवांवर केलेल्या अत्याचाराच्या कथा सर्वांनाच माहित आहेत.
कौरवांनी अनेकवेळा दुष्टपणे वागून पांडवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला होता, त्यांनी द्रौपदीचे वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला होता. लाक्षागृहात जाळण्याचा बेत केला होता, कपटाने द्यूतात हरवून त्यांचे राज्य हिसकावून घेतले होते, त्यांना वनवासात पाठवले होते तसेच एक वर्ष अज्ञातवासात काढायला लावले होते. अर्जुन क्षत्रिय असल्याने नितीशास्त्रानुसार दुष्टांचा नाश करून चांगल्या लोकांचे संरक्षण करणे हे त्याचे कर्तव्य होते मग दुष्टपणे वागणारे लोक जवळचे नातेवाईक असले तरी बेहत्तर, असे नीतिशास्त्र सांगते पण अर्जुन नातेवाईकांच्या मोहात पडला असल्याने त्याला कर्तव्याचा विसर पडला. एव्हढेच नव्हे तर आपलेच म्हणणे कसे बरोबर आहे हे श्रीकृष्णाला पटवून देण्याचा तो प्रयत्न करू लागला. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, जेव्हा माणसाला एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा आपले म्हणणे कसे बरोबर आहे हे पटवून देण्यासाठी तो हजार कारणे पुढे करतो आणि जेव्हा त्याला एखादी गोष्ट करायचीच असते तेव्हा कोणताही विचार न करता ती करून तो मोकळा होतो. येथेही अर्जुनाला युद्ध करायचे नव्हते म्हणून तो श्रीकृष्णाला हे युद्ध का टाळले पाहिजे ह्याबद्दल अनेक करणे सांगू लागला. तो म्हणाला, हे कौरव लोभाने मित्रद्रोह, कुलक्षय इत्यादि गोष्टीवर विचार करायला तयार नाहीत पण आम्ही आपले हित कशात आहे ते पाहिले पाहिजे. ह्यांना मारणे हे महाभयंकर पाप आहे. कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कूळच नाश पावते. या पापाने वंशपरंपरागत चालत आलेल्या धर्माचा लोप होईल आणि मग वर्णसंकर होऊन कुळामध्ये अधर्म माजेल. हे जे सर्व वाडवडील जमले आहेत त्यांस मारून टाकावे असा विचार जरी मनात आला तरी ते सुद्धा पाप आहे आणि हे काही लहानसहान पाप नव्हे. ह्या उप्पर जगण्यापेक्षा शस्त्र टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले. इतकेच काय, पण असे करत असताना मरण जरी आले तरी चालेल पण ह्यांना मारण्याचे पातक करण्याची माझी इच्छा नाही. यांचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग होय.
येथवर युद्धस्थळी काय काय घडलं ते सांगितल्यावर अध्यायाचा समारोप करताना ज्ञानदेव माउली म्हणतात, आता खेदाने खिन्न झालेल्या अर्जुनाला वैकुंठपतीने कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश केला ते सविस्तर जाणून घेणे फार बोधप्रद आहे.
ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थदिपिकेचा
प्रथम अध्याय समाप्त








