कुस्तीपटू विनेश फोगाटप्रकरणी क्रीडा लवादाने दिलेल्या निवाड्यातील निरीक्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्या अपात्रतेविऊद्ध केलेले अपिल फेटाळताना क्रीडा लवादाने (सीएएस) वजन मर्यादेत ठेवणे ही खेळाडूची जबाबदारी आहे आणि दुसऱ्या दिवशी वजन मर्यादेत ठेवण्यात अयशस्वी झाल्याचा परिणाम हा कठोर असला, तरी त्याबाबतीत कोणताही दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वजन कमी करून निर्धारित मर्यादेत ठेवण्यात अपयशी ठरल्याने विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले होते. महिलांच्या 50 किलो वजनी गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत भाग घेण्यास सिद्ध झालेल्या विनेशचे 8 ऑगस्टला 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचे आढळून आले होते.
‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’च्या नियमांनुसार, कुस्तीपटूला स्पर्धेच्या दोन्ही दिवशी वजनाची मोजणी करावी लागते. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून रँकिंग सिरीजसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 2 किलो वजन जास्त असले, तरी स्पर्धेत उतरण्याची परवानगी दिली जाते. परंतु ऑलिम्पिकमध्ये अशी कोणतीही सूट दिली जात नाही.
विनेश ही ऑलिम्पिक फायनलसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली होती आणि विशेषत: तिने अपराजित युई सुसाकीवर मिळविलेल्या जबरदस्त विजयानंतर तिला अपात्र ठरविण्यात आल्याने कुस्तीच्या जगतात खळबळ उडाली होती. ‘लवादाने असा निष्कर्ष काढला आहे की, अर्जदाराने तिच्या स्वत:च्या इच्छेने 50 किलो कुस्ती गटात प्र्रवेश केला होता आणि तिला हे चांगले ठाऊक होते की, स्पर्धेसाठी 50 किलोपेक्षा कमी वजन राखणे आवश्यक आहे’, असे लवादाच्या निर्णयात म्हटले आहे.
‘नियमांच्या अनुच्छेद 7 नुसार प्रत्येक स्पर्धक तिच्या स्वत:च्या इच्छेने भाग घेत असल्याचे मानले जाते आणि ती त्यासाठी जबाबदार असते. तिला फक्त एका वजन श्रेणीमध्ये स्पर्धा करण्याचा अधिकार असतो, जो अधिकृतरीत्या केल्या जाणाऱ्या मोजणीवेळी तिचे जे वजन असते त्याच्याशी सुसंगत असतो. अर्जदार ही एक अनुभवी कुस्तीपटू आहे, ती याआधी नियमांतर्गत स्पर्धांत उतरलेली आहे. तिला वजनाची आवश्यकता समजली नाही असा कोणताही पुरावा नाही, असेही लवादाने म्हटले आहे. लवादाचा तपशीलवार निवाडा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला.









