युरोपीय देशांबद्दलही व्यक्त केली नाराजी : रशियाकडून कच्चे तेल खरेदी नको
वृत्तसंस्था/ कीव
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासमवेत अनेक देशांवर भरभक्कम आयातशुल्क लादले आहे. तर आता युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी ट्रम्प यांचे आयातशुल्काप्रकरणी समर्थन पेले आहे. आयातशुल्क लादून ट्रम्प यांनी योग्य कृती केल्याचे झेलेंस्की यांचे सांगणे आहे. रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर आयातशुल्क लादणे चांगली कल्पना असल्याचे झेलेंस्की यांनी एका मुलाखतीत भारतासंबंधी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले आहे.
अनेक युरोपीय देश आजही रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करत आहेत, हे योग्य नाही. रशियासोबत व्यापार पूर्णपणे संपुष्टात आणला जावा असे झेलेंस्की यांनी ट्रम्प यांच्या आयातशुल्क लादण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे.
3 आठवड्यांपूर्वी ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची भेट झाली होती. त्यानंतरही काहीच बदलले नाही. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ला करत आहे. पुतीन यांच्यावर आणखी दबाव टाकण्याची गरज आहे. हा दबाव अमेरिकेने निर्माण करावा. आमचे काही युरोपीय सहकारी आजही रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करत आहेत. आम्हाला रशियाकडून सर्वप्रकारची खरेदी बंद करावी लागणार असल्याचे झेलेंस्की यांनी सांगितले आहे. पुतीन यांना रोखण्यासाठी रशियासोबतचा व्यापार रोखावा लागणार आहे आणि हे काम केवळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच करू शकतात. ट्रम्प यात यशस्वी होतील असा मला पूर्ण विश्वास असल्याचे वक्तव्य झेलेंस्की यांनी केले आहे.









