साखळीतील वातावरण किंचित थंड. सकाळी पाऊस, संध्याकाळी उखळ.
डिचोली / प्रतिनिधी
पावसाची प्रतिक्षा करीत असह्य उकाड्याने हैराण झालेल्या साखळीवासीयांना काल गुरू. दि. 22 रोजी सकाळी पडलेल्या दमदार पावसामुळे किंचितसा थंडावा मिळाला. साखळीत सकाळच्या वेळी 10 वा. च्या सुमारास दमदार पाऊस पडला. सदर बरसात सुमारे तासभर तरी सुरूच होती. या उलट डिचोली शहर व परिसरात मात्र कडक उन व उकाड्याचा अनुभव लोकांनी घेतला.
सध्या लोकांना पावसाची प्रतिक्षा आतुरतेने लागली आहे. पण पाऊस दररोज हुलकावणी देत आहे. कडक उन व उकाडा यामुळे हैराण झालेल्या लोकांना आता पिण्याच्या पाण्याच्याही समस्येला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांकडून सध्या पावसाला आमंत्रण दिले जात आहे. पण पाऊस अजूनही रूसलेलाच असल्याचे दिसून येते.
काल गुरूवारी सकाळी साखळीत ब्रया प्रमाणात पावसाची बरसात झाली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळाले. सर्व निर्जीव बनलेल्या गटर नाल्यांना जरा जीव आला. शहरातील हवेतही थंड हवामान पसरल्याने कडक उकाड्यापासून लोकांना काहीसा दिलासा मिळाला होता. संध्याकाळीही साखळीतील वातावरण थंडच होते.
डिचोलीत मात्र उलट परिस्थिती होती. पावसाचे ढग काही प्रमाणात दिसत होते. पण बरसात कुठेही झाली नाही. पिळगाव, मये या सारख्या ग्रामीण भागांमध्ये जोरदार पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे. शहरात मात्र पाएस पडलाच नाही. लोकांना असह्य उकाड्यालाच झेलावे लागले.









