वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रजत पाटीदारने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा नवा कर्णधार म्हणून आव्हान स्वीकारलेले असताना या संघातून खेळण्याचा मोठा अनुभव असलेल्या ए. बी. डीव्हिलियर्सने आयपीएल, 2025 च्या सुऊवातीच्या सामन्यापूर्वी संघाच्या नेतृत्वाच्या आव्हानावर भाष्य केले आहे. फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, ए. बी. डिव्हिलियर्स यासारख्या बड्या खेळाडूंनी भूषविलेल्या पदाची जबाबदारी पेलणे हे पाटीदारसमोरील सर्वांत मोठे आव्हान राहणार आहे, असे त्याने जिओ हॉटस्टारशी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे यंदा प्रथमच आयपीएलमध्ये एका डावात 300 धावसंख्या ओलांडली गेलेली पाहायला मिळणे शक्य आहे, असेही त्याने म्हटले आहे.
आरसीबीचा नवा कर्णधार म्हणून पाटीदारची गेल्या महिन्यात घोषणा करण्यात आली होती. तो प्रथमच आयपीएल संघाचे नेतृत्व करणार आहे. पाटीदारला मध्यप्रदेश संघाचा सदस्य म्हणून सर्व स्वरुपांत कर्णधारपदाचा अनुभव आहे. गेल्या वर्षीच्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली मध्यप्रदेशने अंतिम फेरी गाठली होती.
पाटीदारला हे आव्हान कसे पेलता येईल यावरही त्याने चर्चा केली. डीव्हिलियर्स म्हणाला की, त्याने नेहमी त्याच्या खेळावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याला कर्णधारपदासाठी का निवडले आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. त्याने आपल्या शैलीत संघाचे नेतृत्व केले पाहिजे आणि कोहली आणि डु प्लेसिससारखे कर्णधार बनण्याचा प्रयत्न करू नये. डीव्हिलियर्सने विराट कोहलीच्या अनुभवाचाही उल्लेख केला आणि पाटीदारने त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे सांगितले.
आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेयर नियम आणि खेळावरील त्याचा प्रभाव, भरपूर धावसंख्येचे सामने यावरही डीव्हिलियर्सने चर्चा केली. या नवीन नियमाने खेळ पूर्णपणे बदलला आहे. पॉवर प्लेमध्ये जोखीम घेण्यास त्यामुळे वरच्या फळीतील फलंदाज मोकळे होतात. मात्र हे गोलंदाजांसाठी अन्यायकारक आहे. कारण हा नियम फलंदाजांना स्वातंत्र्य देतो आणि क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधांमुळे गोलंदाजी करणे कठीण होते, याकडे त्याने लक्ष वेधले.
‘इम्पॅक्ट प्लेअर नियमाने खूप बदल केला आहे. काही खेळाडूंच्या टिप्पण्यांमधून आम्हाला दिसून आले आहे त्याप्रमाणे पहिल्या तीन फलंदाज मोकळे सुटतात. ते अधिक जोखीम घेऊ शकतात. एक प्रकारे हे थोडेसे अयोग्य वाटते आणि मी त्याबद्दल काही प्रमाणात टीका केलेली आहे. क्षेत्ररक्षणावरील निर्बंध रिंगच्या बाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षकांना ठेवण्यास परवानगी देतात. याच्या जोडीला फलंदाजांना मिळणारे अधिक स्वातंत्र्य पाहता गोलंदाजांसाठी परिस्थिती गुंतागुंतीची होते. या आयपीएल सीझनमध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडला जाताना कदाचित पाहायला मिळेल’, असे डीव्हिलियर्स यावेळी म्हणाला.









