अध्याय सातवा
सर्व विश्व बाप्पांनीच व्यापलेलं आहे हे लक्षात आल्यावर समोर दिसणाऱ्या सर्व व्यक्ती, वस्तू ही बाप्पांचीच रूपे आहेत हे लक्षात घेऊन सर्वांशी आदराने बोलावे आणि विनम्रतेने वागावे. पुढं बाप्पांनी दानं होमस्तपो भक्तिर्जपऽ स्वाध्याय एव च। यद्यत्करोति तत्सर्वं स मे मयि निवेदयेत् ।।21।। सध्या आपण अभ्यासत असलेल्या श्लोकात सांगितल्यानुसार दान, होम, तप, भक्ति, जप, स्वाध्याय असे भक्त जे जे करेल ते ते सर्व त्याने बाप्पांना प्रेमाने अर्पण करावे. ज्याप्रमाणे आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रेमापोटी आपण त्याला हवे असेल ते देऊन टाकतो, त्याप्रमाणे बाप्पांवरील प्रेमापोटी आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट त्यांना अर्पण करावी. बाप्पांची भक्तांकडून हीच अपेक्षा आहे की, भक्तानं त्यांना आपलं म्हणावं. बाप्पांच्या सांगण्यावरून आपल्याला असं वाटेल की बाप्पांना आपल्याकडून काही अपेक्षा आहे परंतु बाप्पा स्वत:च पूर्ण असल्यामुळे त्यांच्याकडे नाही असं काहीच नाही. तरीही तू करशील ते मला अर्पण कर असं बाप्पा सांगताहेत. बाप्पांचे असं सांगणंही आपल्या हिताचंच असतं. कसं ते बघुयात, आपण जे जे करू ते बाप्पांना अर्पण करण्यातून दोन गोष्टी साध्य होतील. पहिली म्हणजे माझ्याबद्दल तुला वाटत असलेला आपलेपणा वाढत जाईल व दिवसेंदिवस माझी तुझ्यावर वाढती कृपा राहील, दुसरं म्हणजे सर्व काही मला अर्पण केल्यामुळे तुझं कर्मफळात गुंतलेलं मन मोकळं होऊन ते माझ्यात गुंतत जाईल. तू मला अनन्यभावे शरण येशील. असे निरपेक्ष भक्त मला फार आवडतात. त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं मला होतं. थोडक्यात त्यांच्या भक्तीचं मला ओझं होतं आणि मी त्यांना परमपद बहाल करतो. कर्मफळाचा त्याग केल्यामुळे पाप पुण्याचं भक्ताचं खातं निरंक होतं. असं करत गेल्यास सरतेशेवटी भक्त मला येऊन मिळण्यास काहीच अडचण येत नाही. अशा पद्धतीने सर्वस्व मला अर्पण करून परमपद मिळवणं कुणालाही शक्य आहे याची ग्वाही बाप्पा पुढील श्लोकात देत आहेत.
योषितोऽथ दुराचाराऽ पापास्त्रwवर्णिकास्तथा ।
मदाश्रया विमुच्यन्ते किं मद्भक्त्या द्विजादयऽ ।। 22 ।।
अर्थ- दुराचारी, पापी, क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र हे माझा आश्रय केला असता मुक्त होतात. मग माझ्या भक्तीने ब्राह्मण मुक्त होतील हे कशाला सांगावयास पाहिजे? माझ्या विभूती जाणणारा माझा भक्त कधीही नाश पावत नाही.
विवरण- बाप्पा म्हणतात, एखाद्याला माझी भक्ती करावीशी वाटते ह्यातच त्याच्या उद्धाराची बीजे रोवली जातात. ब्राह्मण माणसाने शास्त्राध्ययन करावे. त्यानुसार त्याने वर्तणूक ठेवावी हे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे जो वागेल त्याचा उद्धार होतो पण इतर व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायातील व्यस्ततेमुळे माझी भक्ती करण्याला पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणून माझा भक्त, कोणत्याही व्यवसायातला असो, जर त्यानं निरपेक्षतेनं कर्म करून मला अर्पण केलं तर मी त्याचा उध्दार निश्चितच करतो. मुळात कुठलाही व्यवसाय वाईट नसतो पण तो करत असताना ईश्वराचं विस्मरण झालं की, तो करत असताना हातून पापाचरण घडू लागतं. जेव्हा मनुष्य ईश्वराला सन्मुख होतो तेव्हा प्रत्येक कर्म करत असताना मी करत असलेलं कर्म ईश्वराला आवडेल की नाही असा विचार प्रथम त्याच्या मनात येतो आणि चुकीचं कर्म करण्याची होणारी पापवासना त्याच्यापासून दूर निघून जाते. परिणामी त्याच्या हातून पापाचरण होत नाही. आपल्या हातून होणारं पापाचरण टळलं हे लक्षात आलं की, भक्ताला अतिशय आनंद होतो आणि तो बाप्पांच्या अधिकच जवळ जातो. बाप्पाही अशा भक्ताचे अत्यंत चाहते असतात. तेही त्याच्यावर मनापासून प्रेम करत असतात आणि सरतेशेवटी त्याचा उध्दार करतात.








