ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ : संचालिका शौमिका महाडिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर : आरोपांमध्ये तथ्य नसल्याची दिली स्पष्टोक्ती
प्रतिनिधी/ कोल्हापूर
गोकुळ संदर्भात संचालिका शौमिका महाडिक यांनी काही दिवसांपुर्वी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याची स्पष्टोक्ती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच सत्तांतरानंतर गोकुळची वाटचाल प्रगतीपथावर आहे. अशा परिस्थितीत महाडिक यांच्या आरोपांमुळे गोकुळबाबत समाजामध्ये चुकीचा संदेश जावून याचा परिणाम दूध उत्पादकांसह ग्राहकांवर होणार आहे. त्यामुळे संस्थेवर परिणाम होईल अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. राजकारणासाठी काहीही बोलने हे योग्य नाही, अशा शब्दात संचालिका शौमिक महाडिक यांच्या आरोपांना ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळमधील सत्तास्थापनेच्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सभासदांनी आमच्या हातामध्ये गोकुळची सत्ता दिली आहे. त्यामुळे सभासदांनी दिलेल्या या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. टँकरसह इतर सुविधांसाठी आम्हाला सत्ता नको असल्याचा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला. तसेच कष्टकरी दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या श्रमाचे योग्य मोल त्यांच्या पदरात टाकण्यासाठी सत्तेचा वापर करणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
संकलनवाढीसाठी जिल्हा बँकेचे पाठबळ
गोकुळचा 20 लाख लिटर संकलनाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱयांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देणार आहे. दूध उत्पादक शेतकऱयांसह अन्य घटकांना रोजगारासाठी जिल्हा बँकेने 500 कोटी रुपयांची तरतुद केल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
20 लाखाच्या टप्प्यानंतरच दुग्धजन्य पदार्थ शक्य
गोकुळकडुन सध्या संकलित होत असलेले दुध पुरवठय़ासाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी 20 लाख लिटरचा टप्पा ओलांडने आवश्यक आहे. हा टप्पा ओलांडल्यानंतरच दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेत उतरणे शक्य असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
पाच जिल्ह्य़ांचा गोकुळ बँड
पश्चिम महाराष्ट्रात दुधाचा ब्रँड तयार करण्यासाठी गोकुळशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या पाच जिल्हय़ांमध्ये गोकुळ हा एकच बँड करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली येथील दूध संघांनाही गोकुळच्या छताखाली आणण्याचा प्रयत्न असणार आहे. हे जिल्हेही गोकुळचे नेतृत्व स्विकारतील असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न
गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ गोकुळमध्ये हस्तक्षेप करत नाहीत असे वक्तव्य काही दिवसांपुर्वी केले होते. याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ यांनी असे वक्तव्य करुन कदाचित आमच्यामध्ये भांडण लावण्याचा त्यांचा प्रयत्न असले अशी कोपरखळी मारली.
संस्थेचे पालकत्व महत्त्वाचे – अरुण डोंगळे
मुंबईमध्ये जमीन खेरेदीसाठी गोकुळचे दहा वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यांनी हा प्रश्न तत्काळ मार्गी लावला. तसेच प्रशासकीय पातळीवरही पाटील आणि मुश्रीफ यांचा संघ म्हणून गोकुळच्या प्रस्तावांवर गतीने काम होत आहे. मागील सत्ताकाळात असे चित्र नव्हते. त्यामुळे सध्याच्या सत्ताकाळात गोकुळच्या प्रगतीला वेग मिळाला असल्याचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी सांगितले. तसेच पालकत्त्व कोण करत आहे यावरही संस्थेचे भवितव्य अवलंबून असल्याचे संचालक डोंगळे यांनी स्पष्ट केले.