सर्वोच्च न्यायालयाचे मतप्रदर्शन : ‘वेगळे राहायचे असेल तर लग्न करू नका, लग्न म्हणजे दोन आत्मे एकत्र येणे’
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
विवाहाच्या नात्यात पती किंवा पत्नी त्यांना पूर्णपणे स्वतंत्रपणे जगायचे आहे, असे म्हणू शकत नाहीत, असे मतप्रदर्शन गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने यासंबंधी टिप्पणी करताना लग्न म्हणजे दोन आत्मे आणि दोन व्यक्तींचे एकत्र येणे. जर एखाद्या व्यक्तीला स्वतंत्र राहायचे असेल तर त्याने लग्न करू नये, असे स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयात एका जोडप्यामधील वादावर सुनावणी झाली. सदर दाम्पत्याला दोन अल्पवयीन मुले देखील आहेत. यावेळी झालेल्या युक्तिवादानंतर लग्नानंतर पती-पत्नी भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या एकमेकांवर अवलंबून असणे स्वाभाविक आहे असे न्यायालयाने म्हटले. कोणताही पती किंवा पत्नी मी माझ्या जोडीदारावर अवलंबून राहू इच्छित नाही असे म्हणू शकत नाही. लग्नाचा अर्थ परस्पर सहकार्य आणि एकत्रता असा असल्यामुळे दोघांनीही पूर्णपणे वेगळे राहणे अशक्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
मुलांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त
लहान मुलांनी तुटलेल्या कुटुंबाचा भार का उचलावा असा प्रश्न उपस्थित करतानाच जर पती-पत्नी एकत्र आले तर ते मुलांसाठी सर्वोत्तम ठरेल, असे न्यायाधीश नागरत्न म्हणाले. न्यायालयाने दोन्ही पक्षांना त्यांचे मतभेद सोडवून संवादाद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले.
भावनिक संदेश आणि न्यायालयाचा आदेश
सुनावणीदरम्यान, पत्नी म्हणाली की तिला कोणावर अवलंबून राहायचे नाही. यावर न्यायमूर्ती नागरत्न म्हणाले की, तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुम्हाला कोणावर अवलंबून राहायचे नाही. जर असं असेल तर तुम्ही लग्न का केलं? पत्नी नेहमीच भावनिकदृष्ट्या तिच्या पतीवर अवलंबून राहील. न्यायालयाने पतीला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुलांसोबत वेळ घालवण्याचा आणि आठवड्याच्या शेवटी अंतरिम ताबा मिळवण्याचा आदेश दिला. तसेच, न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी निश्चित केली.









