झाशी जिल्ह्यात गॅंगस्टर आणि राजकारणी अतिक अहमद यांचा मुलगा असद अहमद याला चकमकीत ठार केल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सचे कौतुक केले आहे. असद अहमद याच्या एन्काउंटरची बातमी समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक घेवून पोलीस महासंचालक, विशेष महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आणि पोलीस दलाचे अभिनंदन केले. तर असद अहमदचा एनकाउंटर हा इतर गुन्हेगारांसाठी एक संदेश असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी असद अहमदच्या हत्येला ‘ऐतिहासिक’ असे म्हटले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “या कारवाईसाठी मी यूपी एसटीएफचे अभिनंदन करतो. प्रथम त्यांनी गोळीबार केल्याने प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला. हा इतर गुन्हेगारांना संदेश असून हा ‘नवा भारत’ आहे. हे सरकार गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या समाजवादी पक्षाचे नव्हे तर योगी सरकारचे आहे. यूपी पोलिसांची ही एक अतिशय ऐतिहासिक कारवाई आहे… गुन्हेगारांचे युग संपले आहे… आता त्यांनी आत्मसमर्पण केले पाहिजे,” असे ते म्हणाले.









