मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे एकंदरच आत्मघात, विद्यार्थी दशेत दिसून येणारा वाढता हिंसाचार असेल, भावनांचा उद्रेक, टोकाचे अविचारी वागणे हे जगभरात झपाटय़ाने फैलावताना दिसते. एकटेपणा, नैराश्य, क्रोध, न ऐकणे, चिंता, आक्रमकता, लहरीपणा या सातत्याने समोर दिसणाऱया गोष्टी दुर्लक्ष करण्यासारख्या नसून धोक्याची सूचना देणाऱया आहेत. यासाठी प्रत्येकाने सजगतेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. विघातक भावनांवर नियंत्रण आणण्यासाठी मुळात ते कळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तिथे लक्ष असणे वा लक्ष देणे आवश्यक आहे.
भावनिक निरक्षरता टाळण्यासाठी सुरुवातीपासून याचे महत्त्व पटवून ‘भावनिक साक्षरते’च्या दिशेने जाण्यासाठी काय करता येईल याचा विचार आणि कृती खूप गरजेची आहे. आपल्या बुद्धीला वळण लावण्यासाठी जसे आपण, आपले पालक जागरुक असतात तशीच किंबहुना त्यापेक्षा अधिकच जागरुकता भावनांना वळण लावण्यासाठी आवश्यक आहे. खरंतर व्यक्ती ही भावनेबरोबरच वाढत असते पण जेव्हा तिचे भावनिक प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अवाजवी, अवास्तव आणि अप्रस्तुत ठरतात तेव्हा भावनिक प्रशिक्षणामध्ये गडबड असल्याची ती खूणगाठ असते. पहा हं, पालक मुलाचे शिक्षण योग्य वयात सुरू करतात.
चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी झटतात. पाल्य अभ्यासात मागे पडत असेल तर त्यासाठी काय करता येईल याचा विचार करून क्लासेस अर्थात खाजगी शिकवणीची व्यवस्था करतात. मात्र आपण मुलांच्या शैक्षणिक हितासाठी, बुद्धीला वळण लावण्यासाठी जसे जागरुक असतो तसे मुलांच्या भावनांना वळण लावण्यासाठी सुरुवातीपासून जागरुक असतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.
मुलांना स्वत्त्वाचे भान असणे भावनिक हुशारी वाढविण्यासाठी उपयुक्त असतेच परंतु सकारात्मक स्वप्रतिमा तयार होण्यासाठीही ते आवश्यक आहे. काही मूलभूत कौशल्ये मुलांनी आत्मसात करावी म्हणून जे पालक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात त्या मुलांमध्ये स्वत्व जाणीव निश्चितपणे वृद्धिंगत होताना दिसते. आपल्या मुलातील चांगल्या गोष्टींचा डोळसपणे शोध घेऊन त्याच्या बलस्थानाचा त्याला कसा उपयोग होऊ शकतो यावर चर्चा झाली तर हळूहळू त्याला स्वतःच्या क्षमतांची जाण होऊ लागते. त्याचप्रमाणे त्याच्या मर्यादा, स्वभावदोष याची पाल्याला योग्य रीतीने जाणीव करून दिली तर त्यातही सुधारणा करता येऊ शकते.
भावनांची ओळख, मनात उठणारे विविध भावनिक तरंग, भावनांच्या विविध छटा कळणे, मनातील भाव आणि घडणारी कृती यातील तफावत लक्षात येणे अशा गोष्टी मुलांची भावनिक हुशारी वाढविण्यास निश्चित मदत करतात. पहा हं… जसे पावसाची रिमझिम, मुसळधार पाऊस, धुँवांधार पाऊस किंवा कोवळं ऊन, कडक ऊन, वारा, सोसाटय़ाचा वारा अशा विविध छटा कळणे जसे समृद्ध अनुभवासाठी आवश्यक आहे अगदी तसेच भावनांच्या छटांची ओळख सुरुवातीपासून करून देणे आवश्यक आहे.
आनंदाच्या विविध छटा, दुःखाच्या विविध छटा. उदा. परीक्षेत कमी गुण मिळाल्याचे दुःख हे नापास होण्याच्या दुःखापेक्षा वेगळे असते. आपली एखादी वस्तू हरवणे, प्रेमभंग, मैत्री तुटणे, एखाद्या स्पर्धेत हरणे, खेळात हरणे, एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यु होणे या सर्व गोष्टी जरी दुःख निर्माण करणाऱया असल्यातरी त्या त्या प्रसंगी दिले जाणारे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया हे भिन्न असतात, हे भान असणे आणि त्या योग्य प्रमाणात व्यक्त करता येणे महत्त्वाचे असते.
भावनिक कौशल्यातील अग्रक्रमाने महत्त्वाचे असणारे स्वत्त्वाचे भान आपल्या तीव्र आणि प्रतिकूल भावभावनांवर लगाम घालण्याचे काम करत असते. उदा. खूप राग आला आहे.. आतल्या आत.. माझे ऐकत नाही.. ये समोर ये, ..ठारच करतो तुला अशा स्वगतानंतर ‘अरे मला हल्ली खूपच राग येतोय, हे ठीक नाही.
स्वतःला आवरायला हवे’ असे स्वगत आपल्या हातून वाईट कृती होऊ देत नाहीत. टोकाच्या वागण्यापासून आपण परावृत्त होतोच आणि वर्तनातही सुसंस्कृतपणा येतो. भान आल्याने क्षणार्धात रागाचा पारा खाली येतो. भावनिक समायोजन साधून स्वतःमध्ये बदल घडवून आणता येतो.
बाहेरील देशात अनेक ठिकाणी शाळांमध्ये भावनिक प्रशिक्षण देण्यात येते.आपल्याकडेही काही प्रमाणात याची हळूहळू सुरुवात झाली आहे. अशा प्रशिक्षणासाठी शाळेमध्ये एक तास राखीव ठेवणे आणि त्या पद्धतीचे प्रशिक्षक तयार होणेही खूप गरजेचे आहे. हे करत असताना सुरुवातीला मुलांना विविध चित्रांद्वारे भावनांची ओळख करून देता येते, मग स्वतःच्या भावना ओळखणे, त्या शब्दात मांडण्यास सांगता येते. मुलांची भावनिक शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी विविध उदाहरणे कथा, कविता, गाणी, लघुपट, महापुरुषांची चरित्रे आदि अनेक गोष्टींचा उपयोग करता येईल. दैनंदिन जीवनात मुले ताणतणावाला, अपमानाला, आनंदाच्या प्रसंगाला कशी सामोरे जातात याचा अभ्यास करून त्यात गरजेनुसार सुधारणा, भावना व्यक्त करण्याची संधी, भावनांना आवर घालण्याचे कौशल्य हे शिकवता येते. सुनियोजित प्रशिक्षणाद्वारे मुलांमध्ये स्वत्त्वाची जाणीव वाढविता येणे शक्य आहे. मुलांना भावनांची ओळख असेल तर त्यांच्या हाताळणीत चुका कमी होतील.
मला खूपदा चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी आठवते.
उमलणं आणि फुलणं
यात बरंच अंतर आहे
उमलणं अगदी स्वाभाविक आहे
फुलणं त्यानंतर आहे
योग्य वातावरण, पोषक हवामान, योग्य प्रमाणात खतपाणी मिळत असेल तर झाडावर कळीचे उमलणे जेवढे आश्वासक असते तेवढेच तिचे फुलणेही सुंदर असणार याची खात्री पटते. याउलट नीट पोषणमूल्ये न मिळालेल्या झाडावरही कळीचे उमलणे, फुलणे घडतच असते पण ते aत्sद raह या गटात मोडणारे.मुलांच्या विकासाच्याबाबतीत हे बऱयाच अंशी खरे आहे. त्यांच्या भावनिक विकासासाठी पालकांचे अगदी सुरुवातीपासून भावभावनांची ओळख, हाताळणी यासाठीचे सजग प्रयत्न गरजेचे आहेत. पालक, शिक्षक यांचा यामधे सहभाग खूप मोलाचा ठरेल. अर्थात त्यासाठी मात्र प्रत्येकाने प्रामाणिक विचार करायला हवा. त्याची सुरुवात मात्र स्वतःपासून व्हायला हवी असे वाटते.
ऍड. सुमेधा संजीव देसाई








