जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे मत
बेळगाव : बिहार सरकारकडून जातगणतीचा अहवाल सादर केला आहे. याचे स्वागत आहे. त्याप्रमाणेच राज्यामध्येही जातगणतीचा अहवाल सादर केल्यास चांगले होईल, असे बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. सांबरा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आपल्या येथे यापूर्वीच याचा अहवाल तयार आहे. सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. जातगणती अहवाल सादर करणे चांगले आहे. कोणत्या समाजाच्या विकासासाठी कोणते उपक्रम राबवावे लागणार, कोणत्या समाजाला अनुदान द्यावे लागणार, याची माहिती मिळते. सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी याचा अधिक उपयोग होईल. गेल्या निवडणुकीदरम्यान यावर चर्चा झाली होती. मात्र निर्णय झाला नाही. आता आपले सरकार सत्तेत असून यावर चर्चा होणे आवश्यक आहे. लवकरच याकडे सरकारचे लक्ष वळविण्यात येईल. जनगणतीसाठी 200 कोटी खर्च आहे. लवकरच अहवाल जारी करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारचा आहे. शेवटी याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, असे त्यांनी सांगितले.









