वादळी वारा-पावसामुळे दरवर्षीच समस्या : हेस्कॉमसह वन खात्यानेही लक्ष देणे महत्त्वाचे
बेळगाव : वळिवाचा पाऊस सर्वत्र चांगलाच झोडपत असतो. त्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडत असतात. वळिवाच्या दणक्मयाने अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी जीर्ण झालेली झाडे हटवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा पावसाळ्यापूर्वीच अशी धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे शहराच्या सौंदर्यीकरणाच्या नावावर अनेक प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांवरच अनेक झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे या पावसामुळे रस्त्यांवर उन्मळून पडू लागली आहेत. पावसामुळे अनेक घरांच्या भिंतीही कोसळण्याच्या घटना घडत असतात. कित्येकदा काही घरांवरील पत्रे आणि कौलेही उडून गेली आहेत. याचबरोबर झाडांच्या फांद्याही तुटून पडत आहेत. धोकादायक बनलेली काही झाडे रस्त्यांवर कोसळल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. त्यामुळे अशी जीर्ण झालेली झाडे हटविल्यास धोका टळू शकतो. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्या शेजारी मोठी झाडे लावण्यापेक्षा शोभेची व कमी उंचीची झाडे लावल्यास त्याचा परिणाम होणार नाही. ती झाडे अशा पावसामुळे उन्मळून पडणार नाहीत, याची काळजी घेऊनच रोपलागवड करण्याची गरज आहे. शहर व उपनगरांमध्ये जुनाट झाडे पूर्ण जीर्ण झाली आहेत. ती कधी कोसळतील याचा नेम नाही. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी अशी जुनाट झाडे वनविभागाने पावसाळ्dयापूर्वी हटवावीत. महापालिकेने शहरातील जुनाट व जीर्ण झालेल्या झाडांची यादी करावी आणि ती वनखात्याकडे देऊन हटविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
झीर्ण झाडे हटविण्याची मागणी
पहिल्या रेल्वेगेटजवळ वळिवाच्या जोरदार पावसामुळे एक झाड उन्मळून पडले होते. दोन वर्षांपूर्वी झाडाच्या फांद्या पडून दोघा जणांचा मृत्यू झाला तर काही जण सुदैवानेच बचावले. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी वन खात्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी झाडे जीर्ण झाली आहेत. परिसरातील नागरिकांनी ही झाडे हटवण्यासाठी वनखात्याला विनंतीही केली आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्या येत आहे.









