पालकमंत्री गोविंद कारजोळ यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /बेळगाव
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान विसरणे अशक्मय आहे. 75 व्या अमृतमहोत्सव स्वातंत्र्यदिनी देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण प्रत्येकाने आठवले पाहिजे. बलिदानामुळेच आम्ही आज स्वातंत्र्यात जगत असून प्रत्येकाने देशासाठी त्याग देण्याची तयारी दर्शविली पाहिजे, असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनातर्फे 15 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडांगणावर ध्वजारोहण करताना त्यांनी जिह्यातील सर्व जनतेला हे आवाहन केले आहे. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सावरकर, लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल, पं. जवाहरलाल नेहरु यांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी जो त्याग दिला आहे तो कधीच विसरण्याजोगा नाही. ब्रिटिशांनी देशातील जनतेचे अमानुष्य हाल केले. अत्याचार केले. त्या अत्याचाराविरोधात या सर्वांनी झुंज दिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आम्ही स्वातंत्र्य देशात राहत आहोत. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. पण ज्यांनी यातना भोगलेत त्यांच्या यातनांचे स्मरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही भाग्यवंत आहोत. कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्यामुळे आम्ही हवे तसे जीवन जगू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेनुसार आम्हाला अधिकार मिळाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही योगदान विसरण्याजोगे नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या स्वातंत्र्यदिनी बेळगाव शहर तसेच जिह्याचा अधिकाधिक विकास करण्याबाबत आम्ही कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रारंभी पोलीस पथकातर्फे पथसंचलन करण्यात आले. पोलिसांची मानवंदना स्वीकारून पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.