पालक-शिक्षकांनी प्रथम स्वत:मध्ये बदल घडविणे आवश्यक : तेव्हाच मुलेसुद्धा पुस्तकांच्या सहवासात रमतील
बेळगाव
‘पुस्तके तुम्हाला काही सांगू इच्छितात
तुमच्या संगतीत राहू इच्छितात’
परंतु त्यांचे मौनातूनच व्यक्त होणे आपण समजून घ्यायला हवे. वाचन संस्कृती बदलली असे नक्राश्रू ढाळण्यात अर्थ नाही. कारण थेट पुस्तकांचे वाचन होत नसले तरी वाचनाची माध्यमे बदलली आहेत. किंडल, इंटरनेट, ई बूक अशा पद्धतीने आज वाचन सुरू आहे. फक्त नेमकी कोणती पिढी किंवा वर्ग पुस्तके वाचतो आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एक काळ असा होता की पुस्तक वाचण्यासाठी विद्यार्थ्यांकडे वेळ होता. शाळेत ग्रंथालय असायचे आणि वाचनासाठी विशेष एक तास असे. दर शनिवारी सकाळच्या सत्रात सामूहिक कविता म्हणण्याचा प्रघात असे. आज फार कमी शाळांमध्ये ग्रंथालय आहे, वाचनाचा तास याबद्दल साशंकता आहे. कविता म्हणणे तर जवळजवळ थांबले आहे. त्यामुळे उत्तमोत्तम कवितांपासून आजची पिढी वंचित राहिली आहे. कविता म्हणजे नको रे बाबा, असे मुलांना वाटण्याचे कारण म्हणजे त्यांना कविता आणि त्यातील सौंदर्य समजाविण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत.
दुसरीकडे मुलगा सर्वार्थाने स्मार्ट व्हावा या पालकांच्या हव्यासापोटी त्याला इतक्या छंद वर्गांमध्ये कोंबले जाते की त्याला वाचनासाठी वेळ काढणेच कठीण होते. मुलांनी खेळ खेळावेत, परंतु अलीकडच्या मैदानी खेळांपेक्षा प्रतिष्ठित खेळांनाच पालक महत्त्व देत असल्याने मुलांवर लहानपणापासूनच वाचनाचा संस्कार होत नाही. त्यामुळे मुले वाचत नाहीत, अशी तक्रार करण्याचा अधिकारच आपल्याला नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या पुढील पिढींचा विचार केला तर ही पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गॅझेट्सच्या साहाय्याने वाचन करते. त्यांचे वाचनाचे विषय वेगळे आहेत. अभ्यासाच्यादृष्टीने व करिअरच्यादृष्टीने जे महत्त्वाचे त्याचे वाचन प्रामुख्याने ही पिढी करते. नामवंत लेखकांचे उत्तमोत्तम साहित्य वाचण्याकडे या पिढीचा कल तसा कमीच आहे.
ज्येष्ठांचा विचार करता ग्रंथालयातील पुस्तके वाचण्यावर या मंडळींचा भर आहे. त्यामुळे आवर्जुन दर महिन्याला पुस्तक खरेदी करणे याचे प्रमाण नगण्यच. सुदैव इतकेच की ही मंडळी आपण जे वाचतो त्याबद्दल चर्चा करत राहतात. लोकमान्य ग्रंथालयातर्फे सुरू असलेला बुलकचा उपक्रम त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, या बैठकींना उपस्थित राहणारी मंडळी ठरलेली आहे. तरुणाईला अशा बैठकांना आणि चर्चांसाठी कसे वळविता येईल याचा विचार व्हायला हवा. सुदैवाने बेळगावमधील सर्व ग्रंथालये म्हणजे लोकमान्य ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, सरस्वती वाचनालय, वाङ्मय चर्चा मंडळ, अत्यंत महत्त्वाची ठरलेली एसकेई सोसायटीच्या आरपीडी जीएसएसची लायब्ररी यामध्ये पुस्तकांचा अक्षरश: खजिना आहे. त्यांचा लाभ आपण घेतला तर आपण खरेच नशीबवान. या पुस्तकांवर असणारी धूळ झटकण्याची गरज आहे. वाचनाची सवय लागण्यासाठी प्रत्येक घरी एखादे तरी वृत्तपत्र हवे. त्याचे सामूहिक वाचन आणि चर्चा यांची सवय लागली की मुले आपोआप पुस्तकांकडे वळणार हे निश्चित. पुस्तकांच्या किमती परवडत नाहीत, हे चऱ्हाट लावणे बंदच करा. कारण तुडुंब भरलेली हॉटेल्स, बार, पब्ज, मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता पुस्तकांसाठी पैसा नाही हे पटणारेच नाही.
‘उठा आणि पुस्तके वाचा’ असे एका सकाळी सांगून बदल घडणार नाही. त्यासाठी पुस्तक वाचण्याची सवय पालकांना, शिक्षकांना हवी. तरच हा संस्कार पुढील पिढीत उतरणार आहे. मुळात शिक्षक आपल्या विषयापुरतेच वाचन करतात. ते वाचनाबाबत उदासीन आहेत. त्यामुळे प्रथम त्यांनी स्वत:मध्ये बदल करत दररोज पुस्तकांची दहा पाने तरी वाचण्याची सवय लावून घ्यायला हवी (जे शिक्षक वाचन करतात, त्यांचा सन्माननीय अपवाद). मोबाईलपासून मुलांना दूर करणे ही कठीण असली तरी अशक्य अशी गोष्ट नाही. आपल्या सोयीसाठी त्यांच्या हातात मोबाईल द्यायचा व मुले ऐकत नाहीत म्हणायचे हा दुटप्पीपणा झाला. सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ असे न करता आपल्याकडूनच बदल घडला तर मुले पुस्तकांच्या सहवासात रमतील आणि एका अद्भुत अशा दुनियेमध्ये प्रवेश करतील. या वाचनालयातील पुस्तके मुलांना आकर्षित करतीलच, परंतु त्याची रचना इतकी सुंदर आहे की मुले हौसेने तेथे पुस्तके वाचण्यास नक्कीच येतील आणि रमतील. मात्र, पालकांनी या ग्रंथालयाची ओळख त्यांना करून द्यायला हवी.
मुलांसाठी योजना…
बाल वयातच मुलांमध्ये वाचनाची अवड विकसित व्हावी या हेतूने लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी लोकमान्य सोसायटी मराठी भाषा साहित्य व संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने लोकमान्य बाल ग्रंथालय एसकेई सोसायटीच्या आवारातील लोकमान्यच्या इमारतीत सुरू केले आहे.









