प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांचे प्रतिपादन : सरस्वती वाचनालयाच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
बेळगाव : अवयव दान हे स्वेच्छेने केलेले दान आहे. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे अवयव सहा ते सात जणांना देऊन त्यांचा जीव वाचू शकतो. परंतु आपल्या समाजात अवयव दानाविषयी तितकीशी जागृती नाही. माणसाचा जन्म झाला म्हणजे त्याचा मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळे मृत्यू जर येणारच असेल तर आपल्या देहाचा उपयोग इतरांना व्हावा, या उद्देशाने अवयव दानाची चळवळ प्रत्येकापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे मत देगलूर जि.नांदेड येथील वैकुंठवासी धुंडामहाराज देगलूरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी मांडले. शहापूर येथील सरस्वती वाचनालय आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प रविवारी डॉक्टर विजय कुलकर्णी यांनी गुंतले. त्यांनी ‘अवयव दान चळवळ : काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन करत अनेक उदाहरणे दिली. व्यासपीठावर बेळगाव समाचारचे संपादक मधुकर सामंत, वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, कार्यवाहक आर. एम. करडीगुद्दी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार होत्या. डॉ. कुलकर्णी म्हणाले, मनुष्याला जिवंत असताना मूत्रपिंड व यकृत दान करता येते. यकृताचा दहा ते पन्नास टक्के भाग इतरांना देऊन त्यांचा जीव वाचवता येतो. मध्यंतरीच्या काळात मूत्रपिंडाच्या विक्रीच्या घटना समोर आल्या. काही ठिकाणी मूत्रपिंडाची तस्करीही केली जाऊ लागली. त्यामुळे सरकारने यावर निर्बंध घालत केवळ रक्तातील नात्यातच यकृत व मूत्रपिंड दान केले जाऊ शकते, असा नियम घालून दिल्याचे त्यांनी सांगितले. स्वरूपा इनामदार यांनी स्वागत व परिचय करून दिला. विनायक मोरे यांनी सावरकर गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते चित्पावन ब्राह्मण संघ, हमारा देश संघटना व सूर्यकांत शानभाग यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता कुलकर्णी यांनी केले तर विजय देशपांडे यांनी आभार मानले.
पुढील वर्षी होणार शतकोत्तर सुवर्णमहोत्सव
सरस्वती वाचनालयाची स्थापना 1874 मध्ये झाली होती. यावर्षी वाचनालयाचे 149 वे वर्ष असून पुढील वर्षी शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा केला जाणार आहे. बेळगावच्या इतिहासातील एक महत्त्वाचा ठेवा म्हणून सरस्वती वाचनालयाची ओळख आहे. त्यामुळे पुढील वर्षी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांनी दिली.









