कोल्हापूर / कृष्णात चौगले :
आरोग्य विषयक सोयी, सुविधेबरोबरच गर्भवती मातांच्या प्रसुतीचे हक्काचे ठिकाण म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रे. बाळंतपणाच्या शस्त्रक्रियेव्यतीरिक्त नैसर्गिक प्रसुतीसाठी जिह्यातील 76 प्राथमिक आरोग्य केंद्रे सर्वसामान्य जनतेसाठी आधारवड ठरतात. पण एप्रिल ते नोव्हेंबरअखेर जिह्यातील प्रा.आ. केंद्रांमध्ये केवळ 1 हजार 380 तर उपकेद्रांमध्ये 254 महिलांची प्रसुती झाली आहे. गेल्या आठ महिन्यातील हे प्रसुतीचे प्रमाण पाहता खुप कमी आहे. त्यामुळे सीईओ कार्तिकेयन एस यांनी प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागास सूचना दिल्या आहेत. पण दुर्गम भागातील प्रा.आ.केंद्रांमध्ये कुशल आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव आणि पुरेशा आरोग्य यंत्रणेअभावी प्रसुती करताना अनेक मर्यादा येतात. त्यामुळे प्रसुतीचे प्रमाण वाढणे गरजेचे असले तरी संबंधित गर्भवती महिलेची सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे.
जिह्यात चंदगड, आजरा, भुदरगड, शाहूवाडी, गगनबावडा या दुर्गम तालुक्यातील प्रा.आ.केंद्रांमध्ये काम करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची नकारघंटा असते. त्यामुळे आजही दुर्गम प्रा.आ.केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेषत: कुशल कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे तेथे आरोग्य सेवेबरोबरच गर्भवती महिलांची प्रसुती करताना वैद्यकिय अधिकाऱ्यांना अनेक मर्यादा येतात. अति जोखमीच्या गरोदर मातांची प्रसुती प्रा.आ. केंद्रांमध्ये करणे असुरक्षित असते. त्यांच्या प्रसुती दरम्यान महिलेच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्यास तेथून त्यांना कोल्हापुरातील जिल्हा शासकीय रूग्णालायमध्ये (सीपीआर अथवा अन्य शासकीय दवाखान) त्वरीत पाठवणे गरजेचे असते. अशा वेळी त्या दुर्गम प्रा.आ.केंद्रांमध्ये रूग्णवाहिका उपलब्ध करून संबंधित महिलेला शासकीय रूग्णालयात पाठविण्यासाठी सुमारे तीन ते चार तासांचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे अशा जोखमीच्या गरोदर मातांची प्रसुती प्रा.आ.केंद्रांऐवजी शासकीय रूग्णालयातच करणे हिताचे ठरते. तसेच नैसर्गिक प्रसुतीसाठी दुर्गम भागातील प्रा.आ. केंद्रांमध्ये कुशल आरोग्य कर्मचारी देणे आवश्यक आहे.
तालुकानिहाय प्रसुतीचे प्रमाण
जिह्यातील 12 तालुक्यांमधील प्रा.आ.केंद्रांमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर 2024 पर्यंत झालेल्या प्रसुतींचा आढावा घेतल्यास आजरा, भुदरगड, चंदगड, गगनबावडा कागल आणि शिरोळ तालुक्यातील प्रसुतीचे प्रमाण सर्वात कमी आहे. तर हातकणंगले, करवीर, पन्हाळ्यासह दुर्गम असलेल्या शाहूवाडी तालुक्यातही प्रसुतीचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये कागल आणि शिरोळ हे दोन तालुके सुगम असले तरी तेथे प्रसुतीचे प्रमाण कमी आहे. आजरा तालुक्यामध्ये 32 महिलांची प्रसुती झाली असून भुदरगडमध्ये 14, चंदगड 38, गडहिंग्लज 78, गगनबावडा 6, हातकणंगले 263, कागल 79, करवीर 163, पन्हाळा 250, राधानगरी 111, शाहूवाडी 249, तर शिरोळ तालुक्यात 97 प्रसुती झाल्या आहेत.
सीईओंचा वॉच, आरोग्य विभाग अलर्ट
. जिह्यात 99.5 टक्के गर्भवती मातांची संस्थात्मक म्हणजे तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली प्रसुती होते. काही तांत्रिक अथवा कौंटूबिक कारणामुळे ज्या 5 टक्के महिलांची प्रसुती घरात होते, त्या देखील सरकारी हॉस्पीटलमध्ये होणे अपेक्षित आहे. जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये झालेल्या प्रसुतीबाबत सीईओ कार्तिकेयन एस यांनी आढावा घेऊन आरोग्य विभागास प्रसुतीचे प्रमाण वाढविणाच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दर आठवड्यास त्यांच्याकडून आढावा देखील घेतला जाणार आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला असून प्रा.आ.केंद्रांतील प्रसुतीच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.
अति जोखमीची प्रसुती नसेल तर केंद्रांमध्येच होणे आवश्यक
एप्रिल ते नोव्हेंबर 2024 अखेर जिह्यातील प्रा.आ. केंद्र आणि उपकेंद्रातील प्रसुतीबाबत आढावा घेतला होता. यामध्ये अनेक प्रा.आ. केंद्रांमध्ये प्रसुतीचे प्रमाण अत्यंत कमी आढळले होते. त्यामुळे हे प्रमाण वाढवण्याचे आरोग्य विभागास आदेश दिले होते. या बैठकीनंतर पुढील 10 दिवसांतील आढावा घेतल्यानंतर मात्र जिह्यातील प्रा.आ.केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये एकूण 155 गर्भवती महिलांची प्रसुती झाली. सुचनेनंतर दहा दिवसांमध्ये प्रसुतीचे प्रमाण एकदमच वाढले आहे. आता दर आठवड्याच्या सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रसुतीबाबतचा आढावा घेणार आहे. ज्या गर्भवती महिलेची प्रसुती अतिजोखमीची नसेल, नैसर्गिक होत असेल तर ती प्रा.आ.केंद्रांमध्येच होणे अपेक्षित आहे. अनेक दुर्गम तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये जर प्रसुती करण्यासाठी कुशल आरोग्य कर्मचारी नसतील तर तेथील कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याबरोबरच तेथे कुशल आरोग्य कर्मचारी नियुक्तीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच पुरेशी आरोग्य यंत्रणा देखील उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
कार्तिकेयन एस, सीईओ जि.प.कोल्हापूर








