प्रा. सिद्धू अलगूर यांचे प्रतिपादन : महावीर जयंती उत्साहात : शहरात भव्य शोभायात्रा : विविध चित्ररथ सहभागी
बेळगाव : भगवान महावीरांच्या तत्त्वांचे पालन करून जगात शांतता निर्माण केली पाहिजे. महावीरांचे तत्त्वज्ञान जीवनात आचरणात आणणे गरजेचे आहे. त्याचे पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे उद्गार केरळ येथील पेंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सिद्धू अलगूर यांनी काढले. भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव समिती, मध्यवर्ती उत्सव समिती आणि जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उद्घाटन करून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उपमहापौर वाणी जोशी, एम. बी. जिर्ली, माजी आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते. प्रा. अलगूर पुढे म्हणाले, जगातील अनेक देशांमध्ये युद्धे सुरू आहेत.
अशा परिस्थितीत अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या भगवान महावीरांच्या तत्त्वांच्या अवलंब केल्यास शांतता निर्माण होऊ शकते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, जैन धर्म हा जगातील सर्वात शांतताप्रिय समाज आहे. सुसंवाद आणि अहिंसेला प्रोत्साहन देऊन जगणारा हा समाज आहे. प्रास्ताविक राजेंद्र जैन यांनी केले. स्वागत विक्रम जैन यांनी केले. संगीता कटारीया यांनी नमोकार मंत्राचे पठण केले. या निमित्ताने गुरुवारी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेला टिळक चौकातून प्रारंभ झाला. शेरी गल्ली, मठ गल्ली, कपिलेश्वर उड्डाण पूल, एसपीएम रोड, कोरे गल्ली शहापूर-गोवावेसमार्गे महावीर भवन येथे सांगता झाली. शोभायात्रेत विविध चित्ररथ सहभागी झाले होते. याप्रसंगी केपीसीसी सचिव सुनील हणमण्णावर, मनोज संचेती, भरतेशचे सचिव विनोद दोड्डण्णावर, सचिन पाटील, संतोष पेडणेकर यांसह जैन बांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









