बसव संस्कृती मोहीम-2025 च्या समारोप समारंभात सहभागी
बेंगळूर : विश्वगुरु बसवेश्वरांनी अचल जातिव्यवस्थेला विरोध करून एक नवीन धर्म स्थापन केला होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. विश्वगुरु बसवेश्वरांना ‘कर्नाटक सांस्कृतिक नेते’ घोषित करून वर्षपूर्ती झाल्यानिमित्त बेंगळूरच्या राजवाडा मैदानावर लिंगायत मठाधीपती संघटनेने आयोजित केलेल्या ‘बसव संस्कृती मोहीम-2025’ च्या समारोप समारंभात ते बोलत होते. दरम्यान, शरण संस्कृतीचे 301 शरण, गुऊ, स्वामीजींच्या दिव्यसानिद्यात समुदायातील 2 लाखांहून अधिक लोकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा सन्मान करण्यात आला.
सिद्धरामय्या पुढे म्हणाले, विश्वगुरु बसवेश्वरांच्या तत्त्वात श्रद्धा आणि भक्ती आहे. बसवेश्वरांच्या तत्त्वावर आपला विश्वास असून आपण त्याचे पालन केले आहे. आजच नव्हे तर यापुढेही बसवेश्वरांच्या तत्त्वाचे पालन करणे गरजेचे आहे. मी बसवेश्वर जयंतीच्या दिवशीच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याचदिवशी, सर्वांना समान संधी देण्याची बसवण्णांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अनेक योजना, गॅरंटी अमलात आणून सर्व जाती आणि धर्मातील गरिबांच्या जीवनात संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणूनच सर्व सरकारी कार्यालयांमध्ये बसवण्णांचे चित्र लावणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री हेब्बाळकरांचा सन्मान
राज्य सरकारने विश्वगुरु बसवेश्वरांना कर्नाटकचे सांस्कृतिक नेते म्हणून घोषित केले आहे. याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित समारंभात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि भालकी हिरेमठ संस्थानचे अध्यक्ष परमपूज्य श्री श्री श्री बसवलिंग पट्टदेवरु स्वामीजी यांच्या हस्ते महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सन्मान करण्यात आला.









