बेळगाव : कमी खर्चात जास्त उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, जैविक खते, मातीची सुपिकता वाढविणे, पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत धारवाड कृषी विद्यापीठाचे प्रा. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले. एस. निजलिंगप्पा साखर संस्था आणि साखर विकास आयुक्त इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑप. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन केले होते. शेतीमध्ये सुस्पष्टता आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी कसा करावा याबद्दल वेळोवेळी शिक्षण देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. संस्थेचे संचालक राजगोपाल यांनी रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी संस्थेमध्ये ऊस उत्पादनात वाढ करण्यासाढी केले जाणारे संशोधन, प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली.
जास्त उत्पादनासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करून उच्च दर्जाच्या रोपांची लागवड करण्यावर भर दिला. तसेच आधुनिक शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे आवाहन केले. या चर्चासत्रात राज्यातील विविध साखर कारखान्यांच्या 120 हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला. शेती क्षेत्राशी संबंधित अनेक तज्ञांनी व वैज्ञानिकांनी तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर विचार मांडले. धारवाड कृषी विद्यापिठाचे प्रा. डॉ. मिलिंद पोतदार व डॉ. बी. आय. नाडगौडर यांनीही मार्गदर्शन केले. उडुपी कृषी विज्ञान केंद्राचे प्रवीण कुमार यांनी पोषक ऊस उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व ड्रोनचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. कृषी विद्यापिठाचे प्रमुख आर. बी. सुतगुंडी यांनी स्वागत केले. संतोषकुमार पुजारी यांनी आभार मानले.









