प्रथमेश इंदुलकर : सार्वजनिक वाचनालयातर्फे नाथ पै व्याख्यानमालेला प्रारंभ
प्रतिनिधी/ बेळगाव
राजमाता जिजाऊंनी शिवरायांना बालपणीच संस्कारांचे अमृत पाजले, म्हणून शिवराय घडले. त्याचप्रमाणे संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी बालमनावर संस्कारांची नितांत गरज आहे, असे मत प्रथमेश इंदुलकर यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयातर्फे नाथ पै व्याख्यानमालेला हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिरात शनिवारपासून प्रारंभ झाला. यावेळी ते पहिले पुष्प गुंफताना ‘संस्कार महापुरुषांचे’ या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक अनंतराव पाटील, अध्यक्ष अनंत लाड, उपाध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड, सहकार्यवाह अनंत जांगळे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नाथ पै यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. स्वागत अनंत लाड यांनी केले. प्रा. विनोद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
प्रथमेश इंदुलकर पुढे म्हणाले, युवक हा देशाचा प्राण असला तरी आज तो विविध व्यसनांनी भरकटत चालला आहे. त्यामुळे पालक म्हणून आई-वडील मुलांवर संस्कार करायला कमी पडत आहेत. आज चौकाचौकात तरुण तंबाखू, दारू, गुटखा आणि नशेच्या आहारी गेलेले दिसत असल्याची परिस्थिती समाजात दिसत आहे.
शर्टाचं पहिलं बटण चुकलं की बाकीची बटणं आपोआप चुकतात, त्याप्रमाणे बालवयात संस्कारांचं बटण चुकलं की आपोआप आयुष्याचं बटण चुकतं. त्यामुळे मुलांवर बालवयात संस्कार होणे गरजेचे आहे. अलीकडची आई टी.व्ही.मधील सिरियलमध्ये अडकली आहे. त्यामुळे तिला मुलांना द्यायला वेळ नाही, अशी खंतदेखील इंदुलकर यांनी व्यक्त केली.
लहान-सहान संस्कारांतून प्रेम आणि ममत्वाची भावना निर्माण होते. मात्र, जन्मलेल्या मुलांना स्तनपानाऐवजी तोंडाला बाटली लावली जाते. पुढे ती मोठी झाल्यावरही बाटली सोडत नाहीत. संस्काराअभावी भावी पिढी बिघडत चालली आहे.
यावेळी सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठातून बीए आणि एमए परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यवाह सुनीता मोहिते यांनी केले तर आभार सहकार्यवाह अनंत जांगळे यांनी मानले.









