सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुन्हा सिद्ध करण्यासाठी मृत्यूपूर्व जबानी एकमात्र पुरावा ठरू शकतो, याचमुळे मृत्यूपूर्व जबानी खरी अणि विश्वसनीय आहे की नाही हे न्यायालयाने पडताळून पाहणे आवश्यक असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले.
संबंधित व्यक्ती मृत्यूपूर्वी जबानी देताना शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा ‘फिट’ होता का तसेच त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता यासंबंधीची पडताळणी कुठल्याही न्यायालयाने करावी. मृत्यूपूर्व जबानीत विसंगती असल्यास न्यायदंडाधिकाऱयाकडून नोंदविण्यात आलेल्या जबानीवर विश्वास ठेवला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
मृत्यूपूर्व जबानीच्या सत्यतेबद्दल संशय निर्माण करणारी कुठलीच स्थिती असू नये अशी टिप्पणी न्यायाधीश बी. आर. गवई आणि पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने भादंविचे कलम 304- ब (हुंडाबळी) अंतर्गत दोषी ठरविण्यात आलेल्या एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता करताना केली आहे.
मृत्यूपूर्व जबानी सत्य आणि विश्वसनीय आहे का हे न्यायालयाने तपासून पहावे. संबंधित व्यक्ती जबानीवेळी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम स्थितीत होता का तसेच त्याच्यावर कुठलाही दबाव नव्हता याची खातरजमा केली जाणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
मृत्यूपूर्व जबानी हा गुन्हा सिद्ध करण्याचा एकमात्र आधार ठरू शकतो. मृत्यूपूर्व जबानी विश्वसनीय आढळून आल्यास कुठल्याही पुष्टीची आवश्यकता नाही. मृत्यूपूर्व जबानी एकापेक्षा अधिक असल्यास आणि त्यात विसंगती असल्यास न्यायदंडाधिकाऱयाकडून नोंद करण्यात आलेल्या मृत्यूपूर्व जबानीवर विश्वास ठेवला जाऊ शकतो असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.









