पुणे येथील दुसऱ्या सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमात समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे उद्गार
सांगे : महाराष्ट्रात पुणे येथे दुसरा सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रम नुकताच झाला. गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी त्यात भाग घेतला. त्यात बोलताना समाजाप्रति संवेदनशील राहणे गरजेचे असून दिलेली वचने पाळणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. सामाजिक नेतृत्वाला आणि मूल्यांना चालना देणे तसेच समाजाच्या गरजा आणि आकांक्षा सखोल ऐकून आणि समजून घेण्याची क्षमता, सहानुभूती, समज यासारखी महत्त्वपूर्ण कौशल्ये विकसित करणे या उद्देशाने त्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजकल्याणमंत्री फळदेसाई यांची या तीन दिवशीय ज्ञानवर्धक कार्यक्रमात प्रख्यात वत्ते म्हणून उपस्थिती राहून त्यांनी चांगली छापही पाडली. त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण उपस्थितांना भावले आणि त्यातून त्यांनी सामाजिक नेतृत्व स्वीकारण्यासाठी प्रेरणा आणि उत्तेजन दिले.
यावेळी फळदेसाई यांनी अनुभव मांडले. सक्रिय सामुदायिक सहभाग, सहानुभूती आणि समाजाच्या भल्यासाठी प्रामाणिक वचनबद्धता यांच्या महत्त्वावर फळदेसाई यांनी जोर दिला. जेव्हा समुदायाच्या सेवेसाठी स्वत:ला आपण समर्पित करतो तेव्हा व्यक्तींवर काय परिणाम होऊ शकतात, त्याचे उदाहरण त्यांनी सादर केले. दुसरा सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रम म्हणजे सामाजिकदृष्ट्या जागरुकता निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या पुढच्या पिढीवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने सामूहिक वचनबद्धतेचा पुरावा आहे. या कार्यक्रमादरम्यान मिळालेले धडे आणि मिळालेली प्रेरणा आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवून आणत राहील, अशी आशा फळदेसाई यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांतील सामाजिक नेत्यांचे सादरीकरण झाले. त्यापैकी ज्या सामाजिक नेत्यांनी समुदायावर आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रभाव पाडलेला आहे. त्यांच्या यशोगाथेतून बोध घेऊन उज्ज्वल भविष्यासाठी अधिक सर्वसमावेशक कृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.









