पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांचे प्रतिपादन : आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेचे उद्घाटन
प्रतिनिधी / पणजी
विशाल आणि सतत वाढणारी लोकसंख्या असलेला मोठा देश असल्याने पंतप्रधानांच्या शाश्वत विकास साध्य करण्याच्या उद्दिष्टाचा भाग बनण्याचा आमचा मानस आहे. ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. ज्यायोगे एक मोठे राष्ट्र म्हणून स्वत:ची प्रगती साधता येईल आणि शाश्वतता प्राप्त करण्यासाठी पुढे जावे लागेल, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी केले. सर्वच प्रकल्पांना विरोध करू लागलो तर राज्याचा आणि देशाचाही विकास होणे शक्य नाही, असेही ते म्हणाले.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि शाश्वत शिखर परिषदेचे बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ‘शाश्वत भविष्याची निर्मिती’ या मूळ संकल्पनेवर या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शाश्वत उपाय आणि सर्वोत्तम पद्धती सादर करणे हे तिचे उद्दिष्ट आहे. व्यासपीठावर पर्यावरण सचिव अऊण कुमार मिश्रा, सीआयआय गोवाचे उपाध्यक्ष अनिऊद्ध अग्रवाल, मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आदींची उपस्थिती होती.
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
शाश्वत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे, तसेच राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहीम आणि ऊर्जा संक्रमणासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीवर विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर शाश्वतता आणि शून्यापर्यंत पोहोचण्यासाठी बॅटरी स्टोरेजची संकल्पना मांडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कचरा समस्येवर तोडगा काढू
गोवा हे लहान राज्य असले तरीही देश विदेशातून येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे कचऱ्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या परिषदेच्या माध्यमातून त्यावर योग्य उपाय सूचवून तोडगा काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार
वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याच्या गोव्याच्या सक्रिय भूमिकेवर मंत्र्यांनी उजेड टाकला. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करण्यासाठी धोरण तयार करण्यात मदत होईल, असे मंत्री काब्राल यांनी पुढे सांगितले.
पर्यावरण सचिव कुमार मिश्रा यांनी बोलताना कोणत्याही शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असते. त्याच्या मदतीने आपण प्रदूषण कमी करून पर्यावरणाचे रक्षण करू शकतो, असे सांगितले. सीआयआय गोवा राज्य परिषदेचे उपाध्यक्ष अनिऊद्ध अग्रवाल यांनीही यावेळी विचार मांडले. सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो यांनी आभार मानले.
मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार होते. तसेच माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री सुरेश प्रभूही उपस्थित राहणार होते, परंतु दोघेही उपस्थित राहिले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल उल्लेख करताना मंत्री काब्राल यांनी एका महत्त्वाच्या बैठकीसाठी उपस्थित राहावे लागले असल्याने बुधवारी सायंकाळीच मुख्यमंत्री गोव्याबाहेर गेल्याचे सांगितले.









