ता. पं. सभागृहात आयोजित कामगारांच्या तक्रार निवारण बैठकीत माहिती
खानापूर : रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना काम देणे बंधनकारक आहे. जर कामगारांनी मजुरीची मागणी केली तर ती मागणी मान्य करावी आणि निर्दिष्ट दिवसांत काम द्यावे, 15 दिवसांत मजुरी देण्याची कार्यवाही करावी, कामाच्या ठिकाणी मजुरांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, मजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे, तसेच मजुरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, मजुरांकडून कोणतीही तक्रार येणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असे वक्तव्य. जि. पं. चे रोहयोचे संचालक रवी बंगारेप्पनवर यांनी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत यांच्यावतीने गुरुवारी येथील तालुका पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या रोहयो कामगारांच्या तक्रार निवारण बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले.
तांत्रिक सहाय्यकांनी मजुरांनी केलेल्या कामाचे योग्य मोजमाप करावे आणि त्यांना योग्य मजुरी देण्यासाठी कार्यवाही करावी. त्यांनी सांगितले की, मजुरांना आवश्यक ती मदत आणि सहकार्य करावे. कसबा नंदगड, बेकवाड, हलशी, घोटगाळी यासह विविध ग्राम पंचायतींमधील कामगारांनी त्यांच्या समस्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. बंगारेप्पनवार यांनी संबंधित ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री, नरेगा सहाय्यक संचालक रूपाली बडकुंद्री, पंचायत राज सहाय्यक संचालक विजया कोथिन, सहाय्यक जिल्हा कार्यक्रम समन्वयक बसवराज एन. यांच्यासह विविध ग्राम पंचायत विकास अधिकारी, कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार बैठकीला उपस्थित होते.









