पुणे / प्रतिनिधी :
दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे आम्हाला दीर्घ काळापासून सांगण्यात आणि शिकवण्यात आले आहे. पण जेव्हा आम्ही आमच्या चित्रपटातून दहशतवादाच्या नेटवर्कचे चित्रण केले, तेव्हा काही घटकांनी त्याचा संबंध धर्माशी जोडला. हे खेदजनक आहे, अशी खंत ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे विपुल शाह आणि सुदीप्तो सेन या निर्माता-दिग्दर्शक जोडीने शनिवारी येथे व्यक्त केली.
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीटयूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथे ‘मिती फिल्म सोसायटी’तर्फे ‘द केरळ स्टोरी’चे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर या दोघांनी निमंत्रित प्रेक्षकांशी संवाद साधला आणि चित्रपटाच्या निर्मितीदरम्यानचे आणि नंतरचे अनुभव कथन केले.
हा चित्रपट काढण्यामागचा हेतू सांगताना विपुल शाह म्हणाले, हा चित्रपट बनवणे हे माझे कर्तव्य होते. आम्ही हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी दिग्दर्शक सुदीप्तो सेनला सांगितले, की त्यात कुठलीही मखलाशी असता कामा नये. सत्य हे कितीही क्रूर असले, तरी सांगायलाच हवे. देशातील संपूर्ण जनता आमच्या मागे असताना घाबरण्याचा प्रश्नच नव्हता.
दिग्दर्शक सेन म्हणाले, या चित्रपटाने देशभरात खूप चर्चा आणि वाद निर्माण केला आहे, याचा मला आनंद आहे. चित्रपटात जे दाखवले आहे, ते भयानक आणि त्रासदायक आहे, पण आमचे काम लोकांना घाबरवण्याचे नव्हते. लोकांमध्ये माहिती व विचार रुजवणे हा आमचा उद्देश होता. हा प्रचारकी चित्रपट असल्याच्या आक्षेपांना लोकांनीच उत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची घोषणाबाजी
दरम्यान, चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरू असताना एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केली. तसेच चित्रपटाला आलेल्या प्रेक्षकांनीही घोषणा दिल्या. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट विशिष्ट समाजाला दोषी दाखवण्याचा प्रयत्न असून, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केल्याचे एफटीआयआय ‘स्टुडन्ट युनियन’ने सांगितले.








