‘पंख’ संस्थेच्या गौरी मांजरेकर यांचे मत : इनरव्हीलचा अधिकारग्रहण समारंभ उत्साहात
बेळगाव : वेगाने आपण एकटे जाऊ शकतो. परंतु, ध्येयासाठी लांबचा पल्ला गाठायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊनच जाणे महत्त्वाचे ठरते. इनरव्हील क्लब आपल्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने समाजासाठी शिक्षण, महिला सबलीकरण आणि समाजाला आवश्यक असे उपक्रम राबवत आहे, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. आपल्या ‘पंख’ संस्थेला इनरव्हीलच्या सोबत काम करण्यास नक्की आनंद होईल, असे मत ‘पंख’च्या संचालक गौरी मांजरेकर यांनी व्यक्त केले. इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या नूतन अध्यक्षा अपर्णा भटकळ, सचिव बेला शिवलकर, खजिनदार प्रीती भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ गुरुवारी फौंड्री क्लस्टर येथे पार पडला. त्यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर मावळत्या अध्यक्षा मेधा शाह, मावळत्या सचिव ममता जैन, नूतन उपाध्यक्षा संध्या शेरेगार, खजिनदार प्रीती भंडारे, आयएसओ उर्मी शेरेगार, आयएसओ शालिनी चौगुले, एडिटर नेहा पंडित व इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून कीर्ती टेंबे उपस्थित होत्या.
प्रारंभी इनरव्हील प्रार्थना झाली, यानंतर राष्ट्रगीत झाले. रूपा देशपांडे यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. मेधा शाह यांनी स्वागत केले. त्यानंतर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुचेता बागी, स्मिता दळवी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर मेधा शाह यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिले. अनुपमा रजपूत, अमृता जैन, शिल्पा मदली यांनी सभाग़हातील मान्यवरांचे स्वागत केले. मावळत्या सचिव ममता जैन यांनी अहवाल सादर केला. शिल्पा मनोजे यांनी बुलेटिनचे प्रकाशन केले. पिलर ऑफ द इयर म्हणून पुष्पा देशपांडे, मोस्ट कमिटेड मेंबर म्हणून तेजस्विनी हजारे यांना घोषित करण्यात आले. त्यांचा मेधा शाह यांनी सत्कार केला. त्यांनीच नूतन अध्यक्षा अपर्णा भटकळ यांचा परिचय करून दिला. कीर्ती टेंबे यांना आणि पदाधिकाऱ्यांना अधिकार सूत्रे प्रदान केली. छोटे छोटे उपक्रम आणि अल्पसा सहभाग समाजावर मोठा प्रभाव घालू शकतो. यासाठी एकत्रित काम करूया, असे त्या म्हणाल्या.
क्लबने नूतन वर्षात केलेल्या उपक्रमांची माहिती अपर्णा भटकळ यांनी दिली. अधिकार स्वीकारल्यावर त्या म्हणाल्या, इनरव्हील क्लबला समाजकार्याची मोठी परंपरा आहे. समाजात एकटी व्यक्ती बदल करू शकत नाही. क्लबने जबाबदारी दिली असली तरी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठिंब्यावरच आपण क्लबचा वारसा पुढे नेऊ, असे सांगितले. त्यांनी मावळत्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. मंजिरी पाटील यांनी नूतन सदस्यांची व अॅक्टिव्ह सदस्यांची ओळख करून दिली. रिटा पोरवाल, डॉ. अरुणिमा कुलगोड, हर्षा कणवी, श्रीशा पोतदार, कोमल असुंडी, मिनल रायबागी, संजना नाईक यांना रत्ना बेहरे, लता कित्तूर यांनी सदस्यत्वाची पीन दिली. क्लबच्या डिरेक्टरीचे प्रकाशन शालिनी चौगुले यांनी केले. त्यांच्यासोबत संपादन केलेल्या अवंतिका रेवण्णवर उपस्थित होत्या. पाहुण्यांचा सत्कार अपर्णा भटकळ यांनी केला. लकी लेडीची घोषणा स्वाती उपाध्ये यांनी केली. सचिव बेला शिवलकर यांनी आगामी प्रकल्पांची माहिती दिली. सूत्रसंचालन सुषमा शेट्टी व प्रिया खटाव यांनी केले. संध्या शेरेगार यांनी आभार मानले.









