संपूर्ण जगात गोव्याची एक ओळख आहे ती एक पर्यटन स्थळ म्हणून. गोव्याकडे पाहताना एक शांत व पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध असे राज्य म्हणून पाहिले जाते. या ठिकाणी असलेला धार्मिक सलोखा देशभरात कुठेच आढळून येणार नाही. या धार्मिक सलोख्यामुळेच गोव्याची एक वेगळी ओळख साता समुद्रापार पोहचली आहे. त्यामुळेच पर्यटक अगदी बिनधास्तपणे गोव्यात येतात.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून गोव्यात या धार्मिक सलोख्याला तडा तर जाणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुस्लिम व हिंदू बांधवांमध्ये शाब्दीक संघर्ष सुरू झालेला आहे. हा संघर्ष विकोपाला जाण्याअगोदरच सरकारने पावले उचलावी लागतील. जर संघर्ष कायम राहिला तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येणार नाही व त्याचा थेट परिणाम गोव्याच्या पर्यटन व्यवसावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गोव्यात आताच कुठे पर्यटन मोसमाला सुरवात झाली आहे व परिस्थिती अशीच राहिली तर पर्यटनावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. गोव्याची मदार सध्या पर्यटन व्यवसायावरच अवलंबून आहे. अनेकांची रोजी-रोटी पर्यटनावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सध्या जी वादाची ठिणगी पडली आहे, त्यावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी सरकारने पावले उचलावी लागतील.
गोव्यात धार्मिक सलोखा बिघडवून कुणी जर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकारने त्यालाही माफ करू नये. कारण हा राज्याच्या हिताचा प्रश्न आहे. दक्षिण गोव्यात काणकोण व कुंकळळीत मुस्लिम बांधवांना जुलूस काढण्यास बजरंग दलाने तीव्र विरोध दर्शविला व येथूनच वादाची ठिणगी पडली. कुंकळळीत गेली काही वर्षे मुस्लिम बांधव जुलूस काढतात. मात्र, यंदा जुलूस काढू नये असा पवित्रा बजरंग दलाने घेतला व त्यांनी पोलिसांना निवेदन सादर केले. याच वेळी कुंकळळीतील काही व्यापाऱ्यांनी जुलूस काढण्यास कोणतीच हरकत नसल्याची प्रतिक्रीया व्यक्त करतानाच तो शांततेत व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे, कुंकळळीत जुलूस काढण्यात आला. त्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरली. शेवटी त्याचे पडसाद उमटलेच. एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करण्यात आली.
कुंकळळी पोलीस स्थानकावर हिंदू बांधव व मुस्लिम बांधव एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले व अटकेची मागणी सुरू झाली. ज्याला मारहाण झाली, त्या व्यक्तीने हिंदू देवीबद्दल अपशब्द काढल्याने, हिंदूंच्या भावना दुखावल्या व त्याला अटक करावी अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंद करून घेतल्या व गुन्हा नोंद केला.
काणकोण तालुक्यात मुस्लिम बांधवांची संख्या तशी मोजकीच. या ठिकाणी मशिद असल्याची माहिती देखील अनेकांना नाहीच. येथील मुस्लिम बांधव मशिदच्या परिसरातच जुलूस काढायचे. आता या ठिकाणी मुस्लिम बांधवांची संख्या वाढल्याने जुलूस रस्त्यावर काढण्याचा निर्णय घेतला व त्यांनी प्रथमच जुलूससाठी परवानगी मागितली. मुस्लिम बांधवांनी जुलूस काढण्यासाठी परवानगी मागितल्याचे लक्षात येताच, बजरंग दलाने त्याला हरकत घेतली. काणकोणात जुलूस नकोच अशी भूमिका त्यांनी घेतली. या विरोधाला काणकोणातील धार्मिक स्थळाच्या प्रतिनिधीचा पाठिंबा लाभला. त्यामुळे प्रशासनावर दडपण आले व त्यांनी जुलूसला मान्यता देण्याचे टाळले.
काणकोणमध्ये जुलूसला विरोध झाल्याने, काही मुस्लिम बांधवांनी म्हापसा पोलीस स्थानकाला भेट देऊन निवेदन सादर केले व जे मुस्लिम विरोधी विधाने करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याला प्रतिउत्तर देताना म्हापशात मोठ्या संख्येने हिंदू बांधव एकत्र आले व त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवू पाहणाऱ्यांना एक प्रकारे इशाराच दिला. त्यानंतर आरोप व प्रत्यारोपाला सुरवात झाली.
प्रकरण आणखीन चिघळण्यापूर्वीच सरकारने वेळीच उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना कुणीच धार्मिक तेढ निर्माण करू नये व तसेच विनाकारण पोलीस स्थानकावर येऊन तणाव करू नये असे सांगत संभाव्य कारवाईचे संकेत दिले आहेत. पोलिस महासंचालकांनी सुद्धा मुस्लिम बांधवांना चर्चेसाठी बोलावून त्यांना योग्य ती समज दिली आहे.
गोवा हज समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी काणकोण प्रकरणात भाष्य करताना म्हटलेय की, काणकोणच्या मुस्लिम व हिंदू बांधवांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत व त्यांनी एकमेकांशी चर्चा करून तोडगा काढावा. तसेच कुंकळळी प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. शेजारील राज्यातील मुस्लिम बांधव आपले पोट भरण्यासाठी या ठिकाणी आले आहेत, त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडू नयेत, येथील रिती रिवाज समजून घेऊन गोव्यातील धार्मिक सलोखा जोपासावा.
हिंदू व मुस्लिम बांधवांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी काही शक्ती कार्यरत असल्यास सरकारने योग्य ती खबरदारी घेऊन वेळीच परिस्थितीवर नियंत्रण आणावे अशी मागणीही उर्फान मुल्ला यांनी केली. मुस्लिम बांधवांनी टोपी घालू नये, मुस्लिम महिलांनी बुरखा घालू नये अशी मागणी काही जण करतात. पण, त्यांनी आमच्या धर्मात अशी लुडबूड करू नये तसेच मशिदीमध्ये राजकारण आणू नये. आम्ही इतर धर्मांनी काय करावे व करू नये यावर कधीच भाष्य करीत नाही. कारण प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारावर गदा आणू नये असे मतही त्यांनी मांडले आहे.
गोव्यात यापूर्वी कुडचडेत धार्मिक तणाव निर्माण झाला होता. त्याचे पडसाद गोव्यात अनेक ठिकाणी उमटले होते. तशी पुन्हा परिस्थिती निर्माण होता कामा नये. यासाठी सर्वांनी संयम बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. जर धार्मिक सलोख्याला तडे गेले तर त्याचे विपरित परिणाम पर्यटन क्षेत्रावर होतील व जे आपल्या हिताचे मुळीच नाही.
महेश कोनेकर








