अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांताला यांचे आवाहन
बेळगाव : ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याची पावती घेणे आवश्यक आहे. संबंधित वस्तूची कालमर्यादा तपासणेही महत्त्वाचे आहे. ग्राहकाला कायद्यानुसार तो अधिकार आहे. तेव्हा खरेदी करताना प्रत्येक वस्तूची पावती घ्यावी, असे अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांताला यांनी सांगितले. ग्राहक हक्क दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, अन्न आणि नागरी पुरवठा खाते, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभाग, माहिती व प्रसारण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक हक्क दिन कार्यक्रम पार पडला. ग्राहक हक्काची माहिती सर्वांनाच असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्या हक्काबाबतची माहिती जाणून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने ग्राहकाबद्दलची अधिसूचना जारी केली आहे. ती अधिसूचना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणेही महत्त्वाचे आहे. हॉस्पिटल, न्यायालय, पोलीस विभागामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. अतिरिक्त पैसे घेतले जातात. गरीब असो किंवा श्रीमंत, सर्वांना एकच न्याय आहे. तेव्हा प्रत्येकाने कायद्याचा अभ्यास करून त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. बऱ्याच वेळा ग्राहकाची फसवणूक केली जाते, त्याला नाहक त्रास दिला जातो. त्यावेळी त्यांनी न्यायालयात दाद मागितली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, जिल्हा ग्राहक आयोगाचे संजीव व्ही. कुलकर्णी, सुनंदा काद्रोळीमठ, नयना कामते, सदाशिव माळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









