सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2002 च्या नितीश कटारा हत्याकांडातील दोषी सुखदेव यादव उर्फ पहेलवान, याने 20 वर्षे तुरुंगात घालवली असताना त्याला शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही सोडण्यात येऊ नये, या दिल्ली सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला. दिल्ली सरकारच्यावतीने उपस्थित असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अर्चना पाठक दवे यांच्या युक्तिवादावर न्यायमूर्ती अभय एस ओका आणि न्यायमूर्ती उज्जल भुईयां यांच्या खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दोषीला तुरुंगात ठेवणे बेकायदेशी असल्याची टिप्पणी खंडपीठाने व्यक्त केली.
संबंधित आरोपीची शिक्षा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. त्याला एका विशिष्ट कालावधीसाठी शिक्षा सुनावण्यात आली असताना दिलेल्या शिक्षेपेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवण्यात आले, तर तो तुरुंगवास अयोग्य ठरेल. वाढीव एका दिवसाचाही तुरुंगवास बेकायदेशीर ठरेल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
आरोपी सुखदेव यादव याच्यावतीने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ मृदुल यांनी युक्तिवाद केला. आपल्या अशिलाची शिक्षा 9 मार्च 2025 रोजी पूर्ण झाली होती. या तारखेनंतर यादव याला तुरुंगात ठेवण्यासाठी कोणताही कायदेशीर अधिकार नाही. दिल्ली सरकार या शिक्षेचा अर्थ लावण्यात चुकलेले आहे, असे स्पष्ट केले. यावर पुढील सुनावणी 7 मे रोजी होईल









